14/10/2024
जुना लेख
थोडक्यात जीवनपट
आज अक्षय तृतीया १४ मे २०२१.
आज तिथीने माझ्या आईचा आणि वडिलांचा दोघांचाहि, एकाच दिवशी वाढदिवस असतो.
म्हणून मी त्यांच्याविषयी लिखाण करण्याचा केलेला छोटासा प्रयत्न.
जीवन पट उलगडण्याचा प्रयत्न आहे.
वडिलांची जन्म तारीख १० मे १९४० आणि आईची ५ मे १९४६.
आधी थोडी औपचारिक ओळख करून देतो.
*औपचारिक परिचय*
*दत्तात्रेय विष्णू रहाळकर*
शिक्षण: MA(Economics), MSW. ( Tata Institute), LL.B
करियर: १८ वर्षे महिंद्र इंजिनिअरिंग मध्ये पर्सोनेल मॅनेजर म्हणून नोकरी
नंतर पाच वर्षे वकिली व्यवसाय
आणि नंतर मंगल कार्यालय काढून तेथे केटरिंग
*सौ. गायत्री दत्तात्रेय रहाळकर*
माहेरचे नाव: पुष्पा त्र्यंबक बर्वे
शिक्षण: MA ,B.Ed
करियर: वयाच्या अठराव्या वर्षीच नोकरीला लागून पंचवीस वर्षे पुणे टेलीफोन मध्ये सुपरवायझर म्हणून नोकरी,नोकरी करता करता शिक्षण पूर्ण केले.
नंतर सर्व प्रॉव्हिडंट फंड चे पैसे घालून विष्णुप्रसाद नावाचे मंगल कार्यालय काढले व तेथे केटरिंग सेवा दिली.
*बालपण*
माझे वडील चारही भावंडात सगळ्यात मोठे. त्यामुळे माझ्या लहानपणी सगळे त्यांना दादा म्हणायचे. म्हणून मला पण त्यांना दादा म्हणायची सवय लागली.
माझे आजोबा शाळेत मुख्याध्यापक होते व त्यांचे इंग्रजी व संस्कृत वरती खूपच प्रभुत्व होते. त्यामुळे त्यांनी वडलांकडून पण इंग्रजी आणि संस्कृत ची तयारी करून घेतली होती. त्यामुळे दादांचे इंग्रजी आणि संस्कृत वर खूप प्रभुत्व आहे.
माझ्या लहानपणीच दादांनी माझ्याकडून संस्कृत शब्द चालवणे, गीतेचे अध्याय वगैरे पाठ करून घेतले होते.
तसेच त्यांचा आग्रह असायचा कि रोज इंग्रजी पेपर वाचून , त्यातले न कळणारे शब्द काढून त्याचे अर्थ उच्चार सकट पाठ करायचे.
त्यामुळे माझे पण इंग्रजी सुधारण्यास मदत झाली.
पुढे वकिली करत असताना अनेक कोर्टातील न्यायाधीश, इतर वकिलांना सांगायचे ड्राफ्टिंग कसे पाहिजे, तर रहाळकरां सारखे
रहाळकरां सारखे ड्राफ्टिंग शिका त्यांना विचारा कसे करतात ते.
*नोकरी*
महींद्र इंजिनिअरिंग कंपनी, जी, एम सील तयार करायची, त्या कंपनीत १८ वर्षे पर्सोनेल मॅनेजर म्हणून दादांनी काम केले.
तो १९७० चा काळ होता, जेव्हा कंपनीतील कामगार युनियन खूप जोरदार होत्या, aggressive होत्या आणि मॅनेजमेंटच्या लोकांना मारहाण वगैरे करायच्या.
अनेक वेळेला दादा जेंव्हा फॅक्टरीमध्ये राऊंड ला जायचे, तेव्हा कामगार त्यांना स्क्रू ड्रायव्हर फेकून मारणे वगैरे असले उद्योग करायचे.
दादा शिस्तीच्या बाबतीत कडक होते, त्यामुळे त्यांनी कंपनीत एक शिस्त आणली होती.
कंपनीत उशिरा कामावर येणे, कामात अळम टळम करणे ,मुद्दामून जॉब्स बिघडवणे, कामाच्या वेळात उगाच टॉयलेटमध्ये जाऊन टाईमपास करणे वगैरे गैरवर्तणूकीचे प्रकार त्यांनी अनेक वेळा पकडले होते.
अनेक चोऱ्या पण पकडल्या होत्या. जे चांगले प्रामाणिक कामगार होते ते दादांना टिप्स द्यायचे आणि मग गेटवर चोऱ्या पकडल्या जायच्या. बुटा मधून, तांब्याच्या तारा मोज्याच्या आत लपवून नेताना एकदा पकडले होते.
तसेच तो काळ होता तेव्हा दाक्षिणात्य कामगारांची कंपनीत अरेरावी चालायची.
दादा मेरिट वरती लोकांना कामाला घ्यायचे. त्यामुळे जे चांगले मराठी लोक असतील त्यांचे त्यांची निवड व्हायची. त्यामुळे मराठी कामगारांचा टक्का वाढायला लागला आणि दाक्षिणात्य कामगार दबाव टाकू लागले.
तसेच जे मॅनेजमेंटचे निर्णय असतील आणि जे अप्रिय असतील, ते दादांना पर्सोनेल मॅनेजर च्या सहीने नोटीस बोर्डवर लावा, असे सांगितले जायचे आणि त्यामुळे कामगारांच्या असा समज व्हायचा की हे रहाळकर यांनी केले आहे.
ज्या कामगारांना शिस्त नको होती आणि मेमो मिळायचा, ते धमकीची भाषा करायचे.
अशा सगळ्या वातावरणामुळे दादांना पोलिसांशी कायमच संपर्क करायला लागायचा आणि मग पोलीस कंपनीत येऊन बऱ्याच वेळेला कारवाई करायचे.
अशाच काही घटनेमुळे राग मनात ठेवून एका कामगाराने त्यांच्यावरती जीवघेणा चाकूहल्ला केला होता. दादा पिंपरी ला कंपनीत सकाळी स्कूटरवरून रोज जायचे.
तेव्हा शनिवार वाड्या जवळ एका कामगाराने सुरा मारला होता, पण नशिबाने तो असा लागला की पोटात घुसला नाही थोडा कडेला लागला.
अशा परिस्थितीत दादांनी पोटावर हात ठेवून, रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत असताना, रिक्षा करून ,पोलिस चौकी गाठली व झालेला प्रकार शांतपणे सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आणि घरी निरोप पाठवला.
नशिबाने किरकोळ ऑपरेशन करून त्यांची तब्येत सुधारली व त्या कामगारावरती पोलिस केस झाली आणि त्याला दोन वर्षे तुरुंगवासाची सक्तमजुरीची शिक्षा झाली.
दोन वर्षे झाल्यानंतर पोलीस रेकॉर्ड मुळे त्या कामगाराला कुठेही नोकरी मिळेना.
मग तो घरी आला होता आणि दादांच्या पाया पडला आणि माझी चूक झाली मला कोणीतरी भडकावले वगैरे सांगितले.
कृपया मला सर्टिफिकेट द्या, की आता मी गुन्हेगार नाही ,सुधारलो आहे वगैरे
त्यामुळे मला नोकरी मिळेल नाहीतर मला नोकरी मिळत नाहीये. दादांनी त्या कामगाराला पत्र दिले होते, त्यानंतर त्याला नोकरी मिळाली.
नंतर कामगार कायम त्यांना टरकून असायचे.
अशाप्रकारे त्यांनी कंपनीत शिस्त आणली.
आणीबाणीच्या काळात दादा एकदा इंटरव्यू घेत होते. इंटरव्यू ला एक चांगला, हुशार, तरुण मराठी मुलगा आला होता. दादांनी त्याला बाहेरच्या परिस्थितीविषयी, आणीबाणी विषयी वगैरे प्रश्न विचारले .तो मुलगा प्रश्न टाळू लागला. मग दादांनी त्याला प्रश्न विचारला, की बाहेर एवढी परिस्थिती वाईट आहे व अराजकता आहे, आणीबाणी आहे आणि तुम्हाला देशाविषयी काहीच वाटत नाही का?
तेव्हा त्या तरुण हुशार मुलाने खिशातून एक पत्र काढले आणि दाखवले. त्याच्या भावाचे अटक वॉरंट होते. मग त्या युवकाने सांगितले की आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत. त्यामुळे सरकारची आमच्यावरती नजर आहे. माझ्या भावाला अटक झाली आहे. मला पण कधीही अटक होऊ शकते.
तो युवक चांगला शिकलेला होता, प्रामाणिक होता आणि हे त्याने खरे कारण सांगितले हे बघून दादांनी त्याला लागलीच नोकरी दिली.
पुढे जाऊन ते खूप मोठ्या पदावर पोचले आणि अजूनही आमचे त्यांच्याशी घरगुती संबंध आहेत आणि ते दादांना खूप मानतात.
कंपनीमध्ये ड्रेनेजच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून ,दादांनी लॉन वसवली व बाग फुलवली. एक हजार झाडे लावली. हजारावे झाड लावण्यासाठी ,फॉरेस्ट ऑफिसर ला बोलविण्यात आले होते.
आईने पण पुणे मी टेलिफोन मध्ये २५ वर्ष नोकरी केली. वयाच्या अठराव्या वर्षीच मॅट्रिक झाल्यानंतरच ती नोकरीला लागली होती.
टेलिफोन मधील नोकरी खूपच डिमांडिंग होती. तिनही शिफ्ट मध्ये काम करायला लागायचे. नाईट शिफ्ट पण करायला लागायची. आणि त्या काळात वाहनांची सोय नसायची. त्यामुळे बसने जाणे येणे अवघड असायचे. आधी बाजीराव रोड आणि मग कॅम्प ब्रांचला आई होती, तेव्हा नाईट शिफ्ट पण कंपल्सरी करायला लागायची.
बऱ्याच वेळेला सुट्टी पाहिजे असेल, तेव्हा चार बारा, बारा सात अशी ड्युटी करायची म्हणजे दुपारी चार ते रात्री बारा आणि रात्री बारा ते सकाळी सात अशी ड्युटी करायची म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळायची.
*रामाची भक्ती*
आजोबांनी दादांच्या मनावरती असे बिंबवले होते की तुला देऊळ बांधायचे आहे आणि त्यांनी रचलेला एक श्लोक होता -
रामाचे निरपेक्ष दास्य करी तू
मागू नको त्याजला
त्यापायी झिझवी तनू निशि दिनी
सोडू नको भक्तीला
त्याचे सर्व असे तनु, धन तुझे
त्याला समर्पि आधी
शेषाचा उपभोग घेई विधीने
याते चुकेना कधी
या माझ्या आजोबांच्या श्लोका प्रमाणे तंतोतंत ते आयुष्य जगले व दादांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे आजोबांना दिलेले वचन आयुष्यभर पाळले.
देऊळ जुने होऊन पडायला आले होते.
स्वतः सर्व पैसे उभे करून , कोणाचेही पैसे, देणग्या न घेता त्यांनी नवीन देऊळ बांधले आणि त्यांच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली.
देऊळ कायम सर्व कार्यक्रमांना विनामूल्य देण्यात आले आणि अजूनही कुठल्याही कार्यक्रमाचे पैसे घेतले जात नाहीत.
रामनवमीचा उत्सव मोठया प्रमाणात करण्यात येतो आणि प्रसादाच्या पारण्याच्या दिवशी देवळात येणाऱ्या प्रत्येकाला जेवण दिले जाते.
मुलगा म्हणून आजी-आजोबांचे त्यांनी सर्व केले. आजोबा आजारी असताना त्यांची पूर्ण सेवा केली. अगदी त्यांना पॉट देणे व पॉट टाकणे इत्यादी कामे पण बिनबोभाटपणे केली. त्या काळात नर्स वगैरे मिळत नसत.
माझी आजी तर जवळजवळ तीन वर्षे अंथरुणात पडूनच होती. तिच्यासाठी स्वतंत्र खोलीत व्यवस्था करून सकाळी, रात्री दोन्ही वेळेला नर्स ठेवून त्यांनी आजीला शेवटपर्यंत सांभाळले.
*वकिली*
नोकरीतील , कंपनीतील राजकारणाला कंटाळून नोकरी सोडायची voluntary रिटायरमेंट घ्यायची, या दादांच्या निर्णयाला आईने संपूर्ण पाठिंबा दिला व सांगितले माझी नोकरी आहे, तुम्ही वकिलीची प्रॅक्टिस सुरू करा, एक fixed इन्कम चालू आहे.
18 वर्षे पर्सोनेल मॅनेजर म्हणून नोकरी केल्यानंतर स्वतःची लेबर लॉ कंसल्टंट म्हणुन प्रॅक्टीस केली. त्यातही स्वतःची छाप उमटवली. कायद्याचा जबरदस्त अभ्यास आणि खोलात जाण्याची वृत्ती यामुळे न्यायाधीशांना पण कौतुक वाटायचे.
वकिली करत असताना जिथे जिथे अन्याय दिसला, त्याविरुद्ध पब्लिक इंटरेस्ट रिट पिटीशन केली. स्टॅम्प पेपरचा कायम तुटवडा असायचा. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर पाहिजे असेल, तर तो मिळत नाही म्हणून लोकांना 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर विकत घ्यावा लागायचा. म्हणून हा सरासर अन्याय आहे, जनतेच्या पैशाची लूट आहे ,म्हणून त्यांनी हायकोर्टात रिट पिटीशन केले होते आणि दादांच्या बाजूने निर्णय लागला.
कोर्टाने सरकारला स्टॅम्प पेपर पुरेशा प्रमाणात प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
तसेच त्या काळात ते विश्व हिंदू परिषदेचे कसबा भागाचे अध्यक्ष होते आणि विश्व हिंदू परिषदेचे खूप काम त्यांनी केले. पुण्यातील सर्व शीला ज्या अयोध्या ला जाणार होत्या, त्या देवळात ठेवण्यासाठी, त्यांनी जागा दिली. व शीला पूजनाचा कार्यक्रम करून त्या आयोध्येकडे रवाना केल्या.
*कार्यालय व केटरिंग*
कार्यालयाचे काम सुरू केले, त्यात पण कसे जास्तीत जास्त चांगल करता येईल याचा विचार केला.
कस्टमर च्या गरजा काय आहेत आणि त्याप्रमाणे काय करता येईल, याचा विचार करून हॉलमध्ये व केटरिंग मध्ये सतत सुधारणा करत आले. उदाहरणार्थ बारशासाठी बाळंतविडा बांधायला लोकांना दोऱ्या लागतात, चाप लागतात आणि ते कसे बांधायचे असा प्रश्न असतो, त्यासाठी त्यांनी एक लोखंडी अँगल चे stucture कडून घेतले चाप, दोऱ्या वगैरे सगळे त्याला तेथे अडकवलेले असते ,लोकांनी फक्त लहान मुलाचे कपडे चापाला तिथे लावायचे.
हे चाप, दोऱ्या, औक्षणा चे सामान , गोपा,सर्व आमच्यातर्फे दिले जाते. कस्टमर ला घरून आणावे लागत नाही. तसेच साखरपुड्या ला व इतर कार्यक्रमांना जे साहित्य लागते ते हॉल मधूनच दिले जाते.
कस्टमर एखादी वस्तू घरी विसरले तरी ती त्यांना आमच्या घरातून मिळते असे कस्टमरला माहित असल्यामुळे त्यांना टेन्शन येत नाही आणि आणि कस्टमर सांगतात की आम्हाला अगदी घरच्यासारखे वाटते.
कस्टमर शी प्रोफेशनल नाते न ठेवता अगदी घरगुती संबंध आईने ,दादांनी प्रस्थापित केले.
कधी अशी परिस्थिती उदभवली की आमचा हॉल चा संडास धुणारा माणूस वारला, नविन माणूस मिळेना ,तेंव्हा आई दादांनी हॉल चा संडास धुण्याचे पण काम केले. त्याची पण लाज बाळगली नाही.
कस्टमर च्या गरजा काय आहेत ते जाणून त्याप्रमाणे कस्टमरला सर्विस दिली. सुरुवातीला आम्ही फक्त महाराष्ट्रीयन पदार्थच करायचो. पण काही कस्टमर पंजाबी भाज्या कटलेट वगैरे पदार्थ विचारू लागले. हे पदार्थ आधी आईने व दादांनी कधीही खाल्ले नव्हते. मग प्रयोग सुरू झाले. वेगवेगळ्या रेसिपी अभ्यास करून, वेगवेगळ्या हॉटेल्समधून कटलेट आणून, त्यावर प्रयोग करून स्वतःचा असा एक फॉर्म्युला आईने ठरवला.
त्यानंतर आता आमचे बटाटेवडे लोकांना खूप आवडतातच, पण त्याच बरोबर कटलेट, कॉर्न पॅटिस, आलू टिक्की यावर पण लोक तुटून पडतात, फिदा असतात.
तसेच पुरणपोळी, सांजा पोळी आणि खवा पोळी लोकांना खूपच आवडतात . प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर न म जोशी यांनी तर एक पत्र दिले होते, त्यात त्यांनी असे म्हणले होते की *"पुरणपोळीच्या आस्वादा बरोबर, दुधा तुपाच्या सढळ हाताच्या धारांमुळे, पुरणपोळीचा स्वाद द्विगुणित झाला."*
खवा पोळी चा पण, अनेक प्रयोग करून आईने स्वतः एक फॉर्मुला ठरवला आहे त्यामुळे तीच चव कस्टमरला मिळते.
कार्यालयातील सर्व बायका आईला त्यांच्या घरच्या अडचणी पण सांगायच्या आणि आईने त्यांना घरच्या अडचणी, प्रॉब्लेम सोडविण्यात पण मदत केली आहे.
*हिंदुत्व*
विश्व हिंदू परिषद वर बंदी आली. दादांना पण अटक करण्यासाठी पोलिस आले होते. पण असिस्टंट पोलीस कमिशनर ने बघितले की हे स्वतः वकील आहेत आणि दादांनी कुठल्या कलमाखाली अटक करणार वगैरे विचारल्यानंतर मग काही ऍक्शन घेतली नाही.
तसेच हिंदूंवरील अन्यायाविरोधात त्यांनी देवळा बाहेरील फळ्यावर फलक लेखन चालू ठेवले. पोलीस ऑब्जेक्शन घ्यायचे. कायद्याच्या चौकटीत उपरोधिक लिहिल्यामुळे पोलिसांना काही कारवाई करता यायची नाही. शेवटी पोलिसांनी दादांना विनंती केली की कोणी तक्रार केली की आम्हाला हातातले काम सोडून जावे लागते ,त्यामुळे तुम्हाला विनंती की सध्या तणाव निवळे पर्यंत काही लिखाण करू नका, म्हणून मग त्यांनी फलक लेखन थांबवले.
*समाजाचे देणे*
संघाचा गुरु पौर्णिमेचा उत्सव कधीच चुकवला नाही. त्याला कायम हजेरी लावून भरघोस गुरुदक्षिणा द्यायचे. आताही अनेक संस्थांना खूप मोठ्या रकमेच्या देणग्या दिल्या, पण कधी गाजावाजा केला नाही.
वनवासी कल्याण आश्रम, डॉक्टर दिलीप देवधर यांचा वृद्धाश्रम, फडके वेदपाठशाळा इत्यादी संस्थांना मोठ्या देणग्या दिल्या.
तसेच एक गुरुजी होते. दुर्दैवाने त्यांना दोन मतिमंद मुली होत्या. व ते थोडे वयस्कर झाल्यानंतर त्यांचे अचानक डोळे गेले. काही गुरुजी त्यांना स्वतः बरोबर घेऊन जायचे, विधी करण्या करीता , पण ते कायम शक्य होईना, त्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी होऊन बंद पडले. व काही लोक म्हणू लागले की आम्हाला आंधळे गुरुजी नकोत, त्यामुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाली होती.
आईला आणि दादांना हे समजल्यानंतर आईने त्यांना दर एकादशीला रामाला पवमानाचा अभिषेक करा, असे सांगितले आणि दर महिन्याला त्यांना दक्षिणा आणि एक महिनाभर खाणेपिणे पुरेल अशी रक्कम द्यायला सुरुवात केली.
कालांतराने ते गुरुजी अचानक वारले त्यांच्या पत्नीला प्रश्न पडला की आता गुरुजी अभिषेक करू शकत नाहीत तर आपल्याला दक्षिणा कशी काय मिळणार?
पण आईने त्यांना बोलावून घेतले व दोघांनीही त्यांना सांगितले की गुरुजी जरी गेले, तरी आम्ही तुम्हाला दर महिन्याला जे देत होतो, ते बंद करणार नाही.
तुम्ही एकादशीला येत जा आणि त्याप्रमाणे मागचे अनेक वर्ष ,बिनबोभाटपणे, कुठेही वाच्यता न करता , गुरुजींच्या पत्नीला घर चालवणे पुरते पैसे देत आहेत. नंतर दुर्दैवाने त्यांची एक मुलगी वारली.
आता अजून एक मतिमंद मुलगी राहिली आहे. त्या मुलीची त्यांना सतत चिंता असते. आईचे प्रयत्न चालू आहेत की त्या मुलीची कुठे आश्रमात व्यवस्था होईल का अशा चौकशा चालु आहेत. तुम्हाला जर असा कुठला आश्रम माहिती असेल, तर कृपया आईशी संपर्क करून त्यांना मदत करता येईल तेवढी मदत करावी ही नम्र विनंती.
त्याच काळात भाडेकरूंनी जागा सोडल्यामुळे हॉलची जागा रिकामी झाली होती. माझ्या आजीने सुचवले, की येथे मंगल कार्यांसाठी चांगली जागा होऊ शकते. त्याचा विचार करून आईने voluntary रिटायरमेंट करून सर्व प्रॉव्हिडंट फंड चे पैसे दादांना दिले व हॉल बांधला.
एकदा एका नातेवाईकांना व्यवसायात अडचण आली होती. ते विचारायला आले आईला की काही आर्थिक मदत करू शकते का? आईने सांगितले माझे सोने व दागिने पडूनच आहे, ते तुला देते. ते तारण ठेवून तू कर्ज घे. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने तसे केले व आईने दादांनी त्याला कधीही विचारले नाही की किती दिवसांनी तू पैसे परत देणार, कधी देणार अस अजिबात विचारलं नाही.
तसंच कोणाला लॉक डाऊन मुळे व्यवसाय बंद पडला त्यांना, नातेवाईकांना आर्थिक मदत केली ,पैसे उसने दिले.
आई शिवाजी मंदिर येथे हास्य क्लबला व्यायामासाठी जायची. त्याचे बांधकाम निघाल्यामुळे, शिवाजी मंदिर येथील व्यायाम मंडळ बंद पडले . आईने लागलीच त्यांना सांगितले की आमचा हॉल आहे, तिथे तुम्ही पाहिजे तर व्यायाम घेऊ शकता आणि तेव्हापासून हॉलमध्ये व्यायाम मंडळ चालू झाले. आईने सर्व बायकांना व्यायाम करता यावा, म्हणून विनामूल्य हॉल उपलब्ध करून दिला आणि अजूनही ते चालू आहे.
*घरकाम व स्वावलंबन*
दादा आत्ता पण स्वतःची कामे स्वतः करतात.
सकाळी लवकर उठून पाणी भरणे ,आईचे आणि त्यांचे धुणे मशीन ला लावून, ते वाळत टाकणे ,बेडशीट वगैरे धुणे, सकाळचा पहिला चहा तेच करतात. हॉलमधील जी कार्य असतात त्यांचे विरजण दादा स्वतः लावतात. आमच्या येथील ताक आणि दही लोकांना खूप आवडते, कारण खूप आंबट नसते आणि एकदम ताजे असते काही भेसळ नसते.
सकाळी लवकर उठणे कधीही सोडले नाही. आत्ता पण सकाळी लवकर उठून रोज दोन तास व्यायाम करतात. लॉक डाऊन च्या आधी रोज घरापासून सारसबागेत चालत जाऊन तिथे रोज ४ राऊंड मारायचे.जवळपास ४ ते ५ की मी रोज चालायचे.
*आरोग्य व व्यायाम*
दम्याचा, न्यूमोनिया चा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितले , प्राणायाम करत जा .म्हणून प्राणायाम व इतर योगासने शिकण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, ताडीवाला रोड, येथे एका कोर्सला ऍडमिशन घेतली व तो कोर्स पूर्ण केला आणि आता त्याप्रमाणे रोज अनेक व्यायाम योगासने व प्राणायाम करतात. निसर्गोपचार चे वेगवेगळे कोर्स केले आणि ते कायम म्हणत असतात अन्न हे औषध व्हायला हवे, औषध हे अन्न नाही.
दादांची आत्तापर्यंत वेगवेगळी अकरा ऑपरेशन्स झालेली आहेत , पण मानसिक रित्या खंबीर असल्यामुळे, ती सगळी ऑपरेशन्स पचवून, त्यातून दादा सहीसलामत पणे बाहेर आले. म्हणजे मानसिक धैर्य किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी दाखवून दिले.
तसेच आहार आणि आरोग्य ,आहार हेच औषध, आयुर्वेद इत्यादी वेगवेगळी पुस्तके आणून वाचून प्रत्येकाचे गुणदोष ठरवून त्याप्रमाणे ते आहार घेतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
निलगिरी चा मध हा कफासाठी जास्त उपयोगी असतो असे त्यांनी वाचले आणि त्याच्यानंतर नियमित निलगिरी चा मध घेतात त्यामुळे कफ कंट्रोलमध्ये आहे.
*अध्यात्मिक वाचन*
आत्ता पण संपूर्ण गीता, १८ अध्याय सगळे पाठ आहेत.
रोज अध्यात्मिक वाचन करून अभ्यास करतात. त्याच्या नोट्स काढून एक फाईल बनवली आहे व ती सध्या आमच्या डॉक्टरांना वाचायला दिली आहे.
सर्व उपनिषदे, कालिदासाचे मेघदूत ,रामायण महाभारत, संस्कृत मधून वाचून झाले आहे. त्यांना सर्व संस्कृत समजत असल्यामुळे मराठी वाचण्यापेक्षा, संस्कृतमधील वाचन करणे दादा पसंत करतात.
फक्त त्यांना संस्कृत भाषे बद्दल चर्चा करण्यासाठी आणि अध्यात्मिक चर्चा करण्यासाठी कोणी व्यक्ती उपलब्ध नाही याची खंत वाटते. त्यामुळे तुमच्यापैकी कोणी संस्कृत पंडित असेल अथवा उपनिषदे वगैरे चा अभ्यास केला असेल तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता.
दादांची रामा वरती प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा आहे.
देऊळ चांगले करणे आणि व्यवस्थित चालवणे हे त्यांनी स्वतःच्या आयुष्याचे ध्येय ठरवले होते आणि त्या प्रमाणे ते वागले. त्यासाठी त्यांनी पडेल तो त्याग केला.
दरवर्षी रामदास स्वामींच्या पादुका येतात तेव्हा हॉल बंद ठेवून देऊळ व हॉल दोन्ही रामदास स्वामींच्या पादुकांसाठी दादा देतात.
धंद्याचे कितीही नुकसान झाले तरीही, रामदास स्वामींच्या पादुका जेव्हा येणार असतील, तेव्हा धंदा बंद करून, हॉल आणि देऊळ दरवर्षी ते देत आलेले आहेत.
दरवर्षी धान्याची पोती ते रामदास स्वामी संस्थान ला द्यायचे. एक वर्षी त्यांनी मोहन बुवा रामदासी यांना विचारले, की तुम्हाला काय पाहिजे किंवा कमी पडते?
तेव्हा तूरडाळ खूप महाग होती. मोहन बुवा यांनी सांगितले की आम्हाला गहू, तांदूळ वगैरे खूप येतात, पण वरणासाठी तूरडाळ मिळत नाही. कारण तूरडाळ महाग आहे मग दादांनी लागलीच १०० किलो तूर डाळीचे पोते मागवले आणि रामदास स्वामी संस्थान ला दिले.
*देऊळ बांधकाम*
देऊळ खूप जुने झाले होते, खचत चालले होते. नविन बांधण्या साठी खूप खर्च होता. पण दादांनी जवळपास सर्व फिक्स्ड deposit मोडून स्व खर्चाने देऊळ बांधले. कोणाच्याही देणग्या घेतल्या नाहीत.
देऊळ बांधून नविन पूर्ण झाले. पण कळसाचे काम काही होत नव्हते. त्यासाठी पण खूप पैसे लागणार होते. तेव्हा दादांचे आत्येभाऊ श्री. गणेश परांजपे यांनी एक लाख रुपये दिले. तरीही अजून खूप पैसे लागणार होते. माझा मामा (श्री.अशोक बर्वे) आर्किटेक्ट आहे ,त्याने एक सूचना दिली व त्याने सुचवले की माझ्याकडे माणसे आहेत, मी करून घेतो. दादांच्या डोक्यात इस्कॉन सारखा संगमरवरी कळस करायचा असे होते.
पण मामाने सुचवले की आपल्या पद्धतीचे कळस वेगळे असतात , संगमरवरी केले तर ते जैन मंदिरा सारखे दिसेल आणि त्यामुळे मामा ने सुचवल्याप्रमाणे कळस बांधला आणि तो अतिशय सुरेख झाला.
*काही प्रसंग*
लहानपणी एकदा मला खूप ताप भरला होता. ताप डोक्यात चालला होता. धो धो पाऊस पडत होता. अशा वेळेला ते मला घेऊन भर पावसात डॉक्टर नवरंगे म्हणून चिल्ड्रेन स्पेशालिस्ट होते ,त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी ताबडतोब उपचार केले, म्हणून मी ठीक झालो, नाही तर आज मी जसा आहे, तसा नसतो, तर एक मतिमंद मुलगा असतो.
मी किर्लोस्कर brothers मधे नोकरी करत होतो. तेंव्हा तिथे पद्धत होती की डिपार्टमेंट मधील एकेकाने दर शनिवारी सर्वांसाठी वरण भात, आमटी भात किंवा मसालेभात वगैरे आणायचा. आई गरम आमटी भात, भरपूर साजूक तूप घालून, करून देयची व दादा अगदी ऐन वेळी डबा घेऊन यायचे. आमच्या कडील डब्यावर सगळे जाम खुश असायचे.
किर्लोस्कर ला असताना माझे बोट fracture झाले होते, मला गाडी चालवता यायची नाही , तेंव्हा रोज एक महिना मला गाडी वरून सोडायला यायचे.
विपश्यना आचार्य सत्य सत्यनारायणजी गोयंका सांगतात की मातृऋण आणि पितृऋण कधीच फेडता येत नाही .
गुरूजी सांगतात की तुम्ही हा आई-वडिलांना डोक्यावर घेऊन एक हजार वर्षे जरी चाललात तरीही त्या ऋणातून तुमची मुक्तता होत नाही.
धन्यवाद
आमोद रहाळकर