23/06/2021
सौभाग्य जन्मोजन्मीचे... महात्म्य वटपौर्णिमेचे..!
वटपौर्णिमा कशी करावी ?
भाग्य आणि कर्म याबद्दल नेहमीच प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते. मात्र या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणजे आयुष्य होय. भाग्याची साथ नसताना कर्म अपयशी होतं. मात्र तुमची इच्छा शक्ती असेल, विश्वास असेल, श्रद्धा असेल तर भाग्य बदलण्याचं सामर्थ्य कर्मात आहे. वटपौर्णिमेची कथा आपल्याला हेच सांगते. पारंपारिक पद्धती तर आपण पाळतोच. कारण आपल्या संकृतीचा तो एक भाग आहे. मात्र पारंपारिक पद्धतींकडे आधुनिक दृष्टीने बघितल्यास त्यांचे महत्व अजून चांगल्या प्रकारे आपल्या लक्षात येऊ शकते. आता वटपौर्णिमेचेच उदाहरण द्यायचे झाल्यास वडाचे झाड शेकडो वर्ष जगते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्यात प्रचंड असते. त्यामुळे जास्तीत जास्त वडाच्या झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन केल्यास जमिनीतील पाण्याची पातळी वाढू शकते. ही सत्यता लक्षात घेऊन वटपौर्णिमेच्या निमित्ताने किमान एक वडाचे झाड लावून त्याचे आयुष्यभर संवर्धन करण्याचा संकल्प पती-पत्नी नक्कीच करू शकतात.
२४ जून गुरुवार वटपौर्णिमा
जोडीदारांनी एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि सन्मान व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा .
वटपौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा पहाटे 3.32 पासून ते 25 जून रात्रौ 12.09 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही वडाची पूजा करू शकता.
पूजा साहित्य:-
हिरव्या बांगड्या, शेंदूर,काळी पोत, अत्तर, कापूर, पंचामृत, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दूर्वा, गहू, सती मातेचा फोटो किंवा सुपारी इ.
पूजन विधी:
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो. हा संकल्प करून दिवसाला सुरुवात करावी
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा.
प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करुन गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी.
सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करावे.
हळदी-कुंकू, काली पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करावे.
वडाचे मुळाजवळ अभिषेक पुरुष सुक्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी.
वडास हळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.
वडाच्या झाडाला तिहेरी सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्या.
हे मंत्र म्हणावे-
” सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।
तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।
अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।
अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।”
5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी.
सायंकाळी सुवासिनी सह सावित्रीच्या कथेचे वाचन करावे.
या प्रकारे प्रार्थना करावी -
`मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’.
*या सर्व कार्यात जोडीदाराने पुरेपूर सहकार्य करावे. सर्व साहित्य आणून द्यावे बायकोच्या आनंदात सहभागी व्हावे आणि तुझ्या प्रमाणे माझी देखील इच्छा आहे जन्मोजन्मी आपली साथ असावी हे कुठेतरी व्यक्त करावे तिला दिवसभर थोडं सहकार्य करावे तिच्या इच्छाशक्तीवर तुम्हा दोघांचं आयुष्य आनंद ठरणार असतं. शिवाय भारतीय धार्मिक पद्धतीनुसार पुरुष कोणतीही पूजा एकटा करू शकत नाही. प्रत्येकवेळी त्याला जोडीदार आवश्यक असतो. तरच त्याची पूजा पूर्ण होते. परंतु स्त्रीया एकट्या पूजा करू शकतात व ती पूर्ण देखील होते. वटपौर्णिमेच्या पूजेत पुरुषानेही सहभाग नोंदविला तर त्याचे परिणाम निश्चितच वाढतील. संसारिक आयुष्य अजून जास्त सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे होईल.