07/01/2025
नवीन वर्षाची सुरुवात प्राजक्ता आणि मृण्मयी बरोबर कोथरूडच्या टेकडी पासून झाली आणि तेव्हाच ठरवले की ट्रेकिंग परत सुरु करायचे.. मग गडाची शोधा शोध सुरू झाली. जवळ थोडा सोपा पण नवीन 😀 आणि गड सापडला.. घनगड
घनगड पुण्याच्या पश्चिम दिशेला, चांदणी चौक पासून 73 किलोमीटर वर आहे. पायथ्याचे गाव.. एकोले.
ताम्हाणी नंतर निव्हे गाव येते. त्या नंतर एक फाटा फुटतो तो पिंपरी- आहेरवाडी - बार्पे -भांबुर्डे - एकोले.
एक दहा किलोमीटर सोडल्यास बाकी रस्ता एकदम सुंदर आहे.
सकाळी 5.40 ला निघालो आणि 7.40 ला पायथ्याला पोहचलो.
सकाळचे वातावरण प्रसन्न वाटत असले तरी गारवा होता. ग्रामपंचायतीच्या पार्किंग पासून एक मळलेली वाट घनगड च्या दिशेने घेऊन जाते. 10 ते 15 मिनिटात आपण घनेश्वर महादेवाच्या मंदिरात पोहोचतो. शंकराची पिंड, नंदि अशी छोटेखानी रचना, पत्र्याचे छप्पर. बाजूलाच वीरगळ आहे.
वीरगळ म्हणजे ज्ञात अज्ञात वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.
इथून पुढे थोडी जंगलाची वाट सुरु होते. 10-15 मिनिटानी आपण गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत शिलालेख कोरलेला आहे. मंदिरात गारजाई देवीची मूर्ती व इतर मुर्त्या आहेत. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे बाजूला काही वीरगळ पडलेले आहेत.
मंदिरापासून वर चढून गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करतो. तिथे जवळ एक प्रचंड शिळा वरच्या कातळातून निसटून नैसर्गीक कमान तयार झाली आहे. तिथून परत मागे येऊन प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला १५ फुटाच्या कडा आहे. या ठिकाणी पूर्वी पायर्या होत्या. त्या इग्रजांनी सुरुंग लावून उध्वस्त केल्या आहेत. येथे आता लोखंडी शिडी बसवलेली आहे. शिडीच्या शेवटच्या पायरी समोरच कातळात कोरलेले टाक आहे.शिडीच्या संपताना डाव्या बाजूने पुढे गडाची वाट जाते.
कातळात कोरलेल्या पायर्यानी आपण पुढे जातो. इथेच कातळात टेहळणी साठी गुहा आहे. पुढे 12-15 पायर्या चढून आपण पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून बालेकिल्ला मध्ये प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा छोटा आहे. वर 2-3 वास्तूचे अवशेष आहेत. गडमाथ्यावर झेंड्याच्या आजूबाजूला वास्तुंचे अवशेष आहेत. प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला प्रचंड मोठा बुरुज आहे. बुरुजा मध्ये तोफे साठी झरोके आहेत. किल्ल्यावरून सुधागड, आणि तैलबैलाची भिंत हा विहंगम परिसर दिसतो.
इतिहास
* किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो. हा किल्ला कोळी सामंताकडून अहमदनगरच्या निजामशहाकडे आला. पुढे निजामशाही बुडाल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीतील सरदार ढमाले देशमुख यांच्या ताब्यात होता.
* छ. शिवाजी महाराजांनी आदिलशाही सरदार असलेल्या ढमाले देशमुखांना स्वराज्यात सामील करून घेतले, त्याचबरोबर हा किल्ला स्वराज्यात सामील झाला (१६४७). पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांना द्यावा लागला (१६६५).
* महाराजांच्या नंतर किल्ला मोगलांनी ताब्यात घेतलेला दिसतो. छ. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८९) काही काळासाठी या किल्ल्याचा ताबा मराठ्यांकडे होता. १७०० मध्ये हा किल्ला शंकराजी नारायण सचिवांच्या ताब्यात होता; परंतु छ. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला.
* १७१३ मध्ये याचा ताबा परत मराठ्यांनी घेतलेला दिसतो. पंतसचिवांच्या हुकमानुसार कान्होजी आंग्रे यांनी कोरीगड, राजमाची तुंग, तिकोना, लोहगड यांबरोबर घनगड जिंकून घेतला. पुढे १७१४ मध्ये बाळाजी विश्वनाथांच्या मध्यस्थीने छ. शाहू महाराज व आंग्रे यांच्यात झालेल्या तहात हा किल्ला छ. शाहू महाराजांकडे आला.
* भाऊसाहेबांच्या तोतया प्रकरणात सुखनिधान या कनोजी ब्राह्मण तोतयास या किल्ल्यावर काही काळ कैदेत ठेवण्यात आले होते. तसेच तोतयाला मदत करणारा धोंडो गोपाळ केळकर यालाही येथे कैदेत ठेवल्याचे उल्लेख मिळतात.
* बारभाई प्रकरणात राघोबा दादांना मदत करणाऱ्या सखाराम हरी गुप्ते यांना या किल्ल्यावर कैदेत ठेवले होते (१७७७).
* फितुरी उघड झाल्याने गुप्तेंवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला, परंतु १७७९ मध्ये किल्ल्यावरच सखाराम हरी गुप्तेंचा कैदेतच मृत्यू झाला. सखाराम हरी गुप्तेंची पत्नी त्यांना भेटायला किल्ल्यावर येण्यास निघालेली असताना तिला वाटेत तेलबैला जवळील घाटात गुप्ते यांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या बातमीने बसलेल्या धक्क्यामुळे तिचे त्या घाटातच निधन झाले, तेव्हापासून त्या घाटाला ‘सवाष्णी घाट’ अथवा ‘सतीचा घाट’ म्हणून ओळखले जाते.
* पेशवाईच्या शेवटी हा किल्ला बाळाजी कुंजीर यांच्या ताब्यात होता. बाळाजी कुंजीर यांच्याकडून कर्नल प्रॅाथर याने हा किल्ला कोणतीही लढाई न करता जिंकून घेतला (१७ मार्च १८१८).