15/08/2026
आंतरराष्ट्रीय पैलवान भारत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला विशेष लेख..
*गोष्ट एका गदेची*..!
मल्लविद्या व मल्लयुद्धात गदेला पवित्र मानले जाते.अनेक प्राचीन काळापासून गदेचा उल्लेख इतिहासात पाहायला भेटतो. गदा हे शस्त्र महाभारत, रामायण मध्ये युद्धात यांचा वापर केलेला पाहायला भेटतो. महाभारत मध्ये तर भीम, दुर्योधन, जरासंध, बलराम यासारखे योद्धे गदा युद्धा मध्ये पारंगत होते. रामायण मध्ये संपूर्ण वानरसेनाने गदेचा वापर एक शस्त्र म्हणून केलेला आहे. कुस्ती कलेचे दैवत बजरंग बलीच्या हातात देखील गदा पाहायला मिळते. आज गदेचा वापर जरी युद्धात केला जात नसला तरी याचा वापर व्यायाम करण्यासाठी केला जातो. तर अनेक ठिकाणी स्पर्धेतील व मैदानी कुस्ती मध्ये ही गदा विजेत्या मल्लास बक्षीस व सन्मानचिन्ह च्या स्वरूपात दिली जाते.
अशीच एक मानाची गदा मुरगुड येथे झालेल्या मॅट वरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सोनगे गावचा आंतरराष्ट्रीय पैलवान भारत पाटील याला मिळाली. आज काल गदे कडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा पहिल्या सारखा राहिलेला नाही. पूर्वी ज्या कुस्तीला गदा बक्षीस म्हणून ठेवली जायची त्या कुस्तीतील पैलवान हे कर्तुत्वाने मोठे असायचे. देशातील मातबर मल्लांच्या कुस्ती साठीच ही गदा लावली जायची.महाराष्ट्र केसरी,हिंद केसरी, रुस्तम ए हिंद, महान भारत केसरी यासारख्या स्पर्धेतली गदा मिळवलेल्या मल्लाचे नाव तर कुस्ती क्षेत्राच्या इतिहास मध्ये कायमचं घेतले जाईल. त्यामुळे पूर्वी गदा मिळवणारा पैलवानला समाजात खुपचं मोठा सन्मान मिळायचा. गेली दोन दशका पासून आम्हच्या गावाचा भारत पाटील एका चांगल्या स्पर्धेतील गदा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता पण गदा काही हाती लागत नव्हती.त्यातही पंचावन्न साठच्या किलोच्या आसपास वजन असल्यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसारख्या गदेच स्वप्न देखील पाहू शकत नव्हता.
पैलवान भारत पाटील यांचा जन्म सोनगे, ता.कागल येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्याने वयाच्या 8 वर्षी गावातील शाहू आखाडा तालमीत वस्ताद बाळासो पाटील (फौजि), वस्ताद धनाजी पाटील व नितीन पाटील, अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीला सुरुवात केली. जसे लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणे भारत जेव्हा लहान असताना तालमीच्या आखाड्यात उतरायचा तेव्हा हा बारीक चणीचा मल्ल भविष्यात कुस्ती क्षेत्रात नक्कीच नावं मोठं करणार असं जाणवत होतं. गावातील आखाड्यात प्रचंड मेहनत घेऊन भागातील व पंचक्रोशीतील अनेक मैदान तो गाजवू लागला. पुढे शाहू साखर स्पर्धेत दोन तीन वर्षे नंबर काढल्यावर स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेबांनी कारखान्यातर्फे मासिक मानधन सुरू केले. त्यानंतर भारत पाटीलने चांगल्या आधुनिक कुस्ती सरावासाठी कोल्हापूर शहरातील राम सारंग सरांची क्रीडा प्रबोधनी तालीम गाठली. खऱ्या अर्थाने भारत पाटीलच्या कुस्तीक्षेत्रातील प्रवासाला आता सुरुवात झाली होती. घरी अठराविश्व दारिद्र्य, घरी मोल मजुरी करणारे आई वडील यामुळे तालमीतील खर्च चालवण्यासाठी खुप तारेवरची कसरत करावी लागत असे. शाहू कारखान्याच्या माध्यमातून मिळणारे मासिक 500 रुपये मानधन, लोकल स्पर्धेतून व मैदानातून मिळणाऱ्या चार पैशातून त्यांची खुराकाची नड भागायची.
कोल्हापूरात आल्या नंतर भारत पाटील याने दोन स्वप्न उराशी बाळगलं होती. एक शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत नंबर काढून बॉईज स्पोर्ट आर्मीत भरती होणे व दुसरे एक चांगल्या स्पर्धेतून मानाची चांदीची गदा मिळवायची. यातील त्याच पाहिलं स्वप्न पुढच्या दोन वर्षात पूर्ण झालं होतं. आपल्या मनगटाच्या जोरावर व सारंग सरांच्या द्रोणाचार्य सारख्या गुरूंच्या मार्गदर्शनखाली त्याने शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळवलं होत. या प्रमाणपत्र मुळे त्यांची बॉईज सपोर्ट मध्ये सहभागी होण्याचे दरवाचे देखील उघडे झाले होते. काही दिवसानंतर तो बॉईज आर्मी सेंटर मध्ये भरती देखील झाला.
बॉईज स्पोर्ट सारख्या ठिकाणी भरती झाल्यामुळे त्याची खुराकाची चिंता पूर्णपणे मिठली होती. तसेच सेनादलातील कुस्ती प्रशिक्षक अमर निंबाळकर सर, राम पवार, फिरोज मकानदार, बळवंत सर, सुरेंद्र प्रताप सर यांच्यामुळे कुस्तीतील प्रगती दिवसेंदिवस वाढत चालली होती. आपल्या गावातील आंतरराष्ट्रीय पैलवान सुनील पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काही वर्षातच शालेय, कॅडेट व ज्युनिअर स्पर्धेत राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळवली. कोल्हापूर, पुणे महापौर चषक स्पर्धेत विजेता ठरला. राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवून देखील इथ पर्यंतच्या त्यांच्या प्रवासात त्याला एकही गदा मिळाली नव्हती. मात्र इथं त्यानं अजून एक स्वप्न बाळगल होत की गदा जेव्हा नशीबात असेल तेव्हा मिळेल पण त्याआधी आपल्या देशासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवायचे आहे. पुढे साल २०१७ साली ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवीत भारत पाटीलची आशियाई स्पर्धेत निवड झाली. पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत त्याने देशाला रौप्य पद मिळवून दिलं. जिथं चांदीच्या गदा मिळवण्याची स्वप्न बाळगलं होतं तिथं सिल्वर मिडल गळ्यात आलं होतं. त्यावेळी वाटलं की गदा मिळवून फक्त जिल्हाच, गावच नाव मोठं झालं असत . मात्र या पदकामुळे आपल्या गाव, जिल्हा, राज्या बरोबर देशाचं देखील नाव मोठं झालं होतं. थोड्या दिवसांनी त्याची ब्राझील येथे ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी निवड झाली. इथेही त्याने पाच फेऱ्या करत चमकदार कामगिरी केली.
पैलवान भारत पाटील याने त्याच्या कुस्ती कारकिर्दीतील आठरा वीस वर्षांत 3 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत शेकडो पदके मिळवली. आजही त्याच्या घरात कुस्तीत मिळवलेली अनेक प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्हे, पदके, चषक ठेवण्यासाठी जागा देखील नाही आहे. मात्र एवढ्या साऱ्या कष्टाने, मनगटाच्या जोरावर कुस्ती क्षेत्रात कमावलेल्या दौलतीत एकही चांदीची गदा मात्र नव्हती. जेव्हा एखादा विद्यार्थी 99.9% टक्के गुण घेऊन बोर्डात येतो मात्र मला 100% गुण का मिळाले नाहीत म्हणून तो नाराज झालेल्या यासारखी गत भारत पाटीलची झाली होती. पण तोही एक दिवस उजाडला.
2018 साली मुरगुड येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात विजेत्या मल्लास आयोजक मंडळी तर्फे बक्षीस म्हणून मानाची चांदीची गदा जाहीर केली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या भारतने या स्पर्धेत प्रेक्षणीय कुस्त्या करून अंतिम फेरीत धडक मारली होती. चांदीच्या मानाच्या गदेसाठी लढत होणार होती ती बाणगे गावचा उदयोन्मुख पैलवान संतोष हिरुगडे बरोबर. भारत जरी अनुभवाणे थोडा वरचढ असला तरीही संतोषने अल्पावधीतच कुस्तीत केलेली कामगिरी डोळे दिपवणारी होती. शेवटी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी अर्थात शेवटच्या दिवशी सायंकाळच्या सत्रात मानाच्या चांदीच्या गदे साठी अंतिम लढतीला सुरुवात झाली. अतिशय प्रेक्षणीय व काटा लढतीत शेवटच्या क्षणी भारतने बाजी मारली व 57 किलो वजनी गटातील तो विजेता ठरला. जेव्हा चमचमणारी चांदीची गदा त्यांच्या खांद्यावर विराजमान होत होती तेव्हा आम्हा सर्वांच्या, तसेच भारतच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडुन वाहत होता.
अनेक लोक म्हणतात की नशिबात असेल तर सर्व काही मिळतं, पण जे हवं ते मिळवण्यासाठी 99% प्रयत्न करावे लागतात व 1% नशीब लागत. शेवटी कष्टातून ध्येय साध्य करता येत आणि ही गोष्ट भारत पाटीलने दाखवून दिली आहे. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल तर कष्ट व संयम महत्वाचा आहे. हल्ली कुस्ती क्षेत्रातील काही मंडळी नुरा कुस्त्या करून गदा मिळवतात, आपलंच गाव...आपणच गदा कुस्तीला लावायची व आपणच बोलावून आणलेल्या पोराला मैदानात पाडून संध्याकाळी गावात डीजे डॉल्बी लावून मिरवणूक काढायची ही प्रथा कुठंतरी बंद झाली पाहिजे. आज अनेकांच्या घरात अनेक पदके व गदा पाहायला मिळतात. परंतु भारत याने देशासाठी मिळवलेल्या एका पदकाची व एकमेव मिळवलेल्या गदेची सर त्यांना येणार नाही. शेवटी प्रामाणिक व कष्टाने मिळवलेला आनंद हा चिरकाल असतो आणि लुबाडी, बोगसगिरी करून मिळालेली प्रतिष्ठा क्षणभंगुर असते.
भारत पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांचा वाढदिवसा निमित्ताने कधीही समोर न आलेल्या गोष्टीवर आज माझ्या मोडक्या तोडक्या शब्दाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. सदर लेखातून अनावधानाने कुणाची मने दुखावली असेल दिलगिरी व्यक्त करतो.
धन्यवाद.
पैलवान रामदास देसाई.
संकल्पक- कुस्ती हेच जीवन