BTB Cloud Kitchen & Catering Services

BTB Cloud Kitchen & Catering Services "We are your go-to destination for quality food that satisfies every craving! Trust us to bring flavor, freshness, and excellence to your table every time.

BTB Cloud Kitchen

Indulge in the rich and diverse flavors of India with BTB Cloud Kitchen! We specialize in Authentic Indian cuisine, offering a delectable array of Traditional Maharashtrian dishes, mouth-watering Kolhapuri Non-Veg specialties, and fresh, flavorful Konkani Sea Food. Whether you're planning a party or craving a hearty meal, our menu has something for everyone. From Veg and Non-Veg

Snacks, Starters, and Soups to Main Courses and Desserts, each dish is crafted with love and authenticity. Experience the best of Indian culinary traditions with BTB Cloud Kitchen. Perfect for every occasion, delivered right to your doorstep.

उपवास स्पेशल मेन्यू…उपवासाच्या दिवशी आमच्याकडे नेहमीच साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे उपलब्ध असतात. आज गुरुवार… आणि खास ...
16/04/2026

उपवास स्पेशल मेन्यू…

उपवासाच्या दिवशी आमच्याकडे नेहमीच साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे उपलब्ध असतात. आज गुरुवार… आणि खास तुमच्यासाठी स्पेशल साबुदाणा पॅटीस तयार केले आहेत.

बटाटा आणि साबुदाण्याच्या मिश्रणात चविष्ट खोबऱ्याचे सारण भरून बनवलेले हे पॅटीस अप्रतिम चवीचे आणि पोटभर असतात. बाहेरून खमंग आणि आतून मऊ, एकदा खाल्ले की परत परत खावेसे वाटतील असे…

येथील सर्व पदार्थ शुद्ध शेंगदाणा तेलामध्ये बनवलेले असतात. तसेच उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी स्वतंत्र कढई ठेवून आपल्या उपवासाची पूर्ण काळजी घेतली जाते.

तर आजचा उपवास स्पेशल चुकवू नका…

कुठे… ???

कोल्हापुरातील दसरा चौकात,
शहाजी महाविद्यालयाच्या बरोबर समोर
आणि प्रेस क्लबला लागून असलेल्या
हॉटेल ‘खा तरी’ मध्ये.

येताय ना? यायलाच लागतंय.. आणि खायलाच लागतंय…

शरण्ये रेस्टॉरंट संचलित
हॉटेल ‘खा तरी’ - चवदार खात्री.. सोबत मैत्री…
दसरा चौक, शहाजी महाविद्यालय समोर, कोल्हापूर प्रेसक्लब शेजारी, कोल्हापूर.

संपर्क - अजित - 9881129249 सारिका - 9130365036













कोल्हापूरकरsssयायला लागतंय.. खायला लागतंय…एप्रिल मे चे दिवस आले की फणसप्रेमींची चंगळ असते. आधी कच्चे फणस म्हणजे कोयऱ्या ...
08/04/2026

कोल्हापूरकरsss
यायला लागतंय.. खायला लागतंय…

एप्रिल मे चे दिवस आले की फणसप्रेमींची चंगळ असते. आधी कच्चे फणस म्हणजे कोयऱ्या उपलब्ध होतात. त्याची भाजी बनवली जाते. काही दिवसांनी कच्चे गऱ्यांचे फणसही उपलब्ध होतात. कच्च्या गऱ्यांची भाजीही बनवली जाते आणि वेफर्सही तयार होतात. खोबरेल तेलामध्ये तळलेले हे फणसाचे गरे अप्रतिम चवीचे असतात. मे महिन्यात तर गोड गोड फणस आणि गरे भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात.

पण तुम्ही कधी 'फणसाचे 65' खाल्ले आहेत का?
नाही......?
तर कोल्हापुरात प्रथमच उपलब्ध होत आहे 'Jackfruit 65' म्हणजेच 'फणस 65'. जे लोक मांसाहारी आहेत त्यांना 65 हा प्रकार माहिती आहे. परंतु त्याच टेस्टचा आणि त्याच टेक्स्चरचा हा शाकाहारी पदार्थ म्हणजे फणस 65. खरे तर केवळ शाकाहारीपेक्षा आपण त्याला 'विगन' पदार्थ म्हणू शकतो. जे जे पदार्थ चिकन किंवा मटनपासून बनवले जातात, तसे अनेक पदार्थ फणसापासूनही बनवता येतात. अगदी विगन बर्गरही फणसाच्या पॅटीपासून बनवले जातात.

तर लवकर येताय ना...
कुठे... ???
आहो कोल्हापुरातील दसरा चौकात,
शहाजी महाविद्यालयाच्या बरोबर समोर
आणि प्रेस क्लबला लागून असलेल्या
हॉटेल ‘खा तरी’ मध्ये.

येताय ना?
नाही नाही, यायलाच लागतंय.. आणि खायलाच लागतंय…खा तरी चे ‘फणस 65’ भारी..!

हॉटेल ‘खा तरी’ चवदार खात्री.. सोबत मैत्री…
वेळ- ‘फणस 65’ दुपारी 3.00 पासून सायं 7.00 पर्यंत
संपर्क- अजित 9881129249 सारिका 9130365036










उद्या गुढी पाडवा… 🚩✨भिजवलेली हरभरा डाळ, ठेचून घातलेली हिरवी मिरची 🌶️, त्यात किसलेली कच्ची आंबट कैरी 🥭 आणि वरून कढीपत्ता–...
18/03/2026

उद्या गुढी पाडवा… 🚩✨

भिजवलेली हरभरा डाळ, ठेचून घातलेली हिरवी मिरची 🌶️, त्यात किसलेली कच्ची आंबट कैरी 🥭 आणि वरून कढीपत्ता–मोहरीची खमंग फोडणी… अशी झणझणीत, चवदार कच्च्या डाळीची कोशिंबीर कोणाला आवडते? हात वर करा 🙋‍♂️🙋‍♀️

बनवणार असाल तर एक खास टीप 👇
जे मीठ वापरणार ते मोठं मीठ बत्त्यामध्ये कुटून वापरा, आणि तेही अगदी शेवटी घाला… त्यामुळे चव अजून खुलते 😋✨

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸🚩

BTB क्लाउड किचन व केटरिंग सर्विसेस, कोल्हापूर 91303565036

*गॅस टंचाई आणि स्वयंपकाचे नवे मार्ग*  🔥🍲सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत थोडी अनिश्चि...
12/03/2026

*गॅस टंचाई आणि स्वयंपकाचे नवे मार्ग* 🔥🍲

सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत थोडी अनिश्चितता निर्माण झालेली दिसते. काही ठिकाणी घरगुती वापराचे गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यासारख्या हॉटेल व केटरिंग व्यवसायावर दिसू लागला आहे. आम्ही काम करत असलेल्या परिसरातही एक मेस आज गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे पूर्ण दिवस बंद राहिली. त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी 🎓 आणि बाहेरगावाहून नोकरीसाठी आलेले लोक रोज जेवायला येतात. मेस बंद राहिली म्हणजे त्या ठिकाणी काम करणाऱ्या स्टाफसमोरही बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो 👨‍🍳 आणि जे लोक रोज तिथे जेवायला येतात त्यांनाही अचानक अडचण निर्माण झाली. ही फक्त एका मेसची गोष्ट नाही, तर अशा परिस्थितीचा परिणाम अनेक छोट्या व्यवसायांवर आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लोकांवर होऊ शकतो.

ही परिस्थिती किती दिवस राहणार आहे, गॅस कधी येणार आहे, कितपत मिळणार आहे याबाबत अजून स्पष्ट माहिती नाही. त्यामुळे काही ठिकाणी थोडे भीतीचे वातावरणही दिसते. पण अशा वेळी घाबरण्यापेक्षा थोडा वेगळा विचार करणे जास्त उपयोगाचे ठरते. अडचण आली की माणूस नवीन मार्ग शोधतो आणि तिथूनच अनेक कल्पना जन्माला येतात. 💡

आज आम्ही पार्टनर्सनी याच विषयावर बसून चर्चा केली. आमच्याकडे गॅस शेगड्या सोडून इलेक्ट्रिक फायर, इलेक्ट्रिक स्टीमर, फ्रीज, मिक्सर आणि चहा-कॉफी मशीन अशी साधने आहेत. त्यांचा उपयोग करून काही पदार्थ तयार करता येतील का याचा विचार केला. त्यातून असे लक्षात आले की गॅस कमी वापरून किंवा अजिबात न वापरता देखील अनेक पदार्थ करता येऊ शकतात. उदाहरणार्थ स्टीमरमध्ये व्हेज-नॉनव्हेज मोमोज 🥟, उकडीचे मोदक, स्टीम कोथिंबीर वडी, ढोकळा, राईस इडली किंवा रवा इडली सोबत मिक्सरवर बनवलेली नारळ अथवा शेंगदाणा चटणी, स्टीम्ड कॉर्न 🌽 आणि स्टीम्ड मिक्स भाज्या, मॅगी, नूडल्स किंवा पास्ता 🍜 करता येतात. इलेक्ट्रिक फ्रायरवर वडा, साबूवडा, पॅटिस, कटलेट करता येतात. त्याशिवाय दडपे पोहे, चहा-कॉफी ☕, बॉइल्ड एग्ज 🥚, बॉइल्ड चिकन, व्हेज सँडविच 🥪, एग सँडविच, दहिवडी, दही-पुरी असे पदार्थही करता येऊ शकतात. पेयांमध्ये ताक, कोकम सरबत, लिंबू सरबत 🥤 असे पर्याय देता येतात. अशा प्रकारे थोडा विचार बदलला तर मर्यादित साधनांमधूनही ग्राहकांना अन्न देणे शक्य आहे.

गंमत म्हणजे आज एका रीलमध्ये पाहिले की साध्या पाणी गरम करण्याच्या कॉइलचा वापर करून कोणीतरी गरमागरम मटण रस्सा बनवत होते आणि दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये इस्त्रीवर छोटी चपाती बनवताना दाखवले होते. रोजच्या स्वयंपाकासाठी हे योग्य आहे असे नाही, पण अडचण आली की माणूस किती वेगवेगळे उपाय शोधू शकतो याचे ते एक उदाहरण आहे. 😄 थोडक्यात सांगायचे तर मार्ग नेहमी असतो, फक्त थोडा विचार बदलण्याची गरज असते. इंडक्शन कूकटॉप, इलेक्ट्रिक स्टीमर, इलेक्ट्रिक राईस कुकर आणि आपली लाडकी चूल 🔥 असे पर्याय आपण वापरू शकतो.

हॉटेल व्यवसायिकांनीही घाबरून न जाता पर्याय शोधले तर परिस्थिती हाताळता येऊ शकते. ग्राहकांनीही या काळात थोडे सहकार्य केले तर ही अडचण सहज पार होऊ शकते. कारण हॉटेल, मेस आणि केटरिंग व्यवसाय हा केवळ व्यवसाय नसून अनेक लोकांच्या रोजगाराशी आणि रोजच्या अन्नाशी जोडलेला असतो. 🤝

गृहिणींच्यासाठी देखील ही गोष्ट उपयोगाची ठरू शकते. गॅस नसताना देखील काही साधे पदार्थ सहज बनवता येतात. उदाहरणार्थ दडपे पोहे, दही पोहे, वेज सॅलड 🥗, स्प्राउट सॅलड, फ्रूट सॅलड 🍎, भेळ, ड्राय भेळ, शेंगदाणा-काकडी चाट, उकडलेल्या कडधान्यांचे सॅलड, सँडविच, जॅम सँडविच, पीनट बटर सँडविच, दही काकडी, दही पुरी, मिक्स फ्रूट प्लेट, पपई किंवा केळीची प्लेट, ताक, लस्सी, कोकम सरबत, लिंबू सरबत, केळी शेक, मँगो शेक 🥭, कोल्ड कॉफी असे अनेक पर्याय सहज करता येतात.

जर तुमच्या डोक्यात गॅसशिवाय बनवता येतील असे अजून काही सोपे पदार्थ किंवा उपाय असतील तर ते कमेंटमध्ये जरूर सांगा. 💬 तुमच्या कल्पना इतरांनाही उपयोगी पडू शकतात. कधी कधी अशा छोट्या कल्पनांमधून मोठे उपाय सापडतात.

या निमित्ताने प्रशासनालाही सहकार्य करण्याची आपली भूमिका असली पाहिजे. परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन, पुरवठा व्यवस्था, व्यापारी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. संयम, समजूतदारपणा आणि सहकार्य या तीन गोष्टी या काळात खूप महत्त्वाच्या आहेत. 🙏

अडचणी या कायमच्या नसतात. त्या आपल्याला थोडा वेगळा विचार करायला भाग पाडतात. थोडी कल्पकता, थोडे धैर्य आणि एकमेकांचे सहकार्य असेल तर कोणतीही परिस्थिती आपण पार करू शकतो.

१२ मार्च २०२६
*सागर विलास बकरे, कोल्हापूर*

संचालक – सतसात्विक फूड्स प्रा. लि.
BTB क्लाउड किचन व केटरिंग सर्विसेस 🍽️
हॉटेल खा-तरी, दसरा चौक, कोल्हापूर 📍

18/01/2026

We are fully booked from 16th to 27th January.
Heartfelt thanks to our customers, friends, and family for your trust and support.

-BTB Cloud Kitchen & Catering Services, Kolhapur

आम्ही नवीनच सुरू केलेल्या आमच्या हॉटेल कॅन्टीनमध्ये काही कॉलेजवयीन मुलं एका टेबलवर बसून गप्पा मारत होती. त्यातील बऱ्यापै...
10/01/2026

आम्ही नवीनच सुरू केलेल्या आमच्या हॉटेल कॅन्टीनमध्ये काही कॉलेजवयीन मुलं एका टेबलवर बसून गप्पा मारत होती. त्यातील बऱ्यापैकी सीनियर दिसणाऱ्या एका मुलाने कोणाला तरी फोन लावला होता. तो समोरच्याला समजावून सांगत होता-
“परीक्षा द्यायला नको का? एकदा सुरुवात केली आहे, तर त्याचा शेवट नको करायला?”

हे वाक्य कानावर पडताच माझ्या अतिरंगी मेंदूमध्ये सर्वात आधी आठवण झाली ती ‘जुमांजी’ या चित्रपटाची.

1995 साली प्रदर्शित झालेला ‘जुमांजी’ हा एक ऍडव्हेंचर फँटसी चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा एका जादुई बोर्ड गेमभोवती फिरते. अ‍ॅलन नावाचा मुलगा एका छोट्या शहरात राहतो. एका जुन्या पेटीत सापडलेला ‘जुमांजी’ नावाचा खेळ तो आपल्या मैत्रीण सारा हिच्यासोबत खेळायला सुरुवात करतो. पण पासा टाकताच अ‍ॅलन थेट त्या गेमच्या आत अडकतो आणि अचानक गायब होतो. घाबरलेली सारा खेळ अर्धवट सोडून पळून जाते, आणि अ‍ॅलन अनेक वर्षे त्या जादुई जंगलात अडकून राहतो.

सुमारे सव्वीस वर्षांनंतर जूडी आणि पीटर नावाची दोन भावंडे त्या घरात राहायला येतात. त्यांना तोच जुमांजी गेम सापडतो. खेळ सुरू होताच गेममधील घटना खऱ्या जगात घडू लागतात. जंगलातील प्राणी, पूर, भीती आणि गोंधळ संपूर्ण शहरात पसरतो. खेळ जसा पुढे जातो, तसा एका टप्प्यावर अ‍ॅलन पुन्हा प्रकट होतो, मात्र तो आता मोठा झालेला असतो. सारा देखील पुन्हा भेटते. सुरुवातीला भीतीने गारठलेली असली, तरी शेवटी ती धैर्याने खेळात सहभागी होते.

खेळ जसजसा शेवटाकडे जातो, तसतशी संकटे अधिक तीव्र होतात. पण सर्वजण एकत्र येऊन खेळ पूर्ण करतात. खेळ संपताच सर्व काही पूर्ववत होते, वेळ मागे फिरतो आणि आयुष्याला नवी दिशा मिळते. ‘जुमांजी’ ही केवळ एक चित्रपट कथा नसून, धैर्य, जबाबदारी आणि हार न मानण्याची शिकवण देणारी गोष्ट आहे.

2005 साली आलेला ‘झथुरा- अ स्पेस अ‍ॅडव्हेंचर’ हा चित्रपट अनेकदा जुमांजीचा स्पेस-व्हर्जन म्हणून ओळखला जातो. यात खेळ बदलतो, जागा बदलते, पण नियम तोच राहतो- ‘खेळ पूर्ण केल्याशिवाय सुटका नाही’.

2019 च्या कोल्हापुरात आलेल्या महापुरासोबत आमच्या आयुष्यातही अनेक संकटांनी एकाच वेळी प्रवेश केला. महापुरात आमचं संपूर्ण व्यवसायाचं ठिकाण पाण्याखाली गेलं. ज्या जागेत आम्ही व्यवसाय करत होतो ती महानगरपालिकेची असल्याने, त्यासंबंधीचा एक वेगळा वाद आजही न्यायप्रक्रियेत आहे. कोविडच्या काळात तर अनेकांची अक्षरशः वाताहत झाली, त्यात आम्हीही एक होतो.

मात्र कोविडच्या दुसऱ्या लाटेत एक संधी दिसली. मूळ व्यवसाय जरी बंद असला, तरी आम्ही क्लाऊड किचन या नव्या वाटेवर पाऊल ठेवलं. कोविडनंतर या व्यवसायातही चांगल्या संधी दिसू लागल्याने, मूळ व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यावरही क्लाऊड किचन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान शिवाजी रोडवरील गोडाऊनला आग लागण्याची घटना घडली. ही आग आमच्या वडिलांनी स्थापन केलेल्या श्री प्रोसेस वर्क्सच्या युनिटपर्यंत पसरली. त्या आगीत तो व्यवसाय पूर्णपणे भस्मसात होणं, हा आमच्या कुटुंबासाठी आणखी एक मोठा धक्का होता.

मात्र आज मागे वळून पाहताना जाणवतं की कोविडमध्ये फूड व्यवसायात प्रवेश करण्याचा निर्णय योग्यच होता. क्लाऊड किचनसोबतच आउटडोअर केटरिंगच्या ऑर्डर्सही हळूहळू येऊ लागल्या. आणि आज त्या सगळ्या संघर्षांच्या पायावर आम्ही आमचा मूळ ट्रॉफीचा व्यवसाय, क्लाऊड किचन आणि केटरिंगचा व्यवसाय, तसेच नव्याने पार्टनरशिपमध्ये घेतलेलं हे उपहारगृह चालवत आहोत.

या अत्यंत कठीण काळात अनेकांनी आमचं मनोधैर्य वाढवलं. मित्रांच्या सहकार्याला तर खरंच तोडच नाही. विशेष करून आमचे अजितदादा, जे केवळ आमचे व्यावसायिक पार्टनर नव्हते, तर भावाप्रमाणे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संकटाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची साथ मिळत गेली, आणि आजही ती साथ तितकीच भक्कम आहे. तसेच आमच्या दोन्ही व्यवसायांमधील स्टाफ कमालीचा समजूतदार, सहकार्यशील आणि आपुलकीने साथ देणारा आहे. अशा माणसांसोबत काम करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, याबद्दल आम्ही स्वतःला खरोखर भाग्यवान समजतो.

इतक्या अडचणी आल्या की त्या काळात कधी कधी हे सगळं सोडून द्यावंसं वाटायचं. “एकदा सुरुवात केली आहे, तर त्याचा शेवट नको करायला?” या वाक्यामुळे मला जरी ‘जुमांजी’ किंवा ‘झथुरा’ आठवला, तरी प्रत्यक्षात ही कथा आमचीच आहे, असं वाटलं.

जुमांजीमध्ये खेळ संपतो तेव्हा सर्व काही पूर्ववत होतं. आणि आज मला असं वाटतंय की आम्ही देखील या गेमच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर उभे आहोत.

तुम्हीही हे लक्षात ठेवा—
सुरुवात केली आहे, तर तिचा शेवट झालाच पाहिजे.

नववर्षाच्या शुभेच्छा.

सारिका आणि सागर बकरे, कोल्हापूर
संचालक
श्री प्रोसेस वर्क्स
सत सात्विक फूड्स प्रा. लि.
BTB क्लाऊड किचन व केटरिंग सर्विसेस

11/12/2025

हिंदू धर्मात सोळा संस्कारांना अनन्य साधारण महत्व आहे. या पैकीच एक म्हणजे ‘अन्नप्राशन विधी’ किंवा काही ठिकाणी ‘अन्नपूर्णा संस्कार’ असंही म्हणतात. याच महिन्यात एका गोड आणि खास बाळाचा अन्नप्राशन विधी होतोय. छोट्या बाळाला पहिल्यांदा खाऊ घातलं जाणार आहे आणि अर्थातच हा बाळाचा स्पेशल खाऊ त्याची आई बनवणार आहे.

पण या खास दिवशी येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही चविष्ट स्नॅक्स आणि जेवणाचाही बेत आहे, तो मात्र आम्ही बनवत आहोत. स्नॅक्स मध्ये पावभाजी, मुंबई वडा, समोसा, कांदा पोहे… आणि मेन कोर्स मध्ये पूर्ण जेवण. त्यासाठी आज आम्ही त्यांना एक सॅम्पल थाळी बनवून दिली.

नेहमीसारखंच दर्जेदार साहित्य, स्वच्छता आणि भरपूर प्रेम घालून ही थाळी तयार केली…
आम्हाला खात्री आहे, त्यांना आवडेल आणि त्यांच्या पाहुण्यांनाही..!

तुम्हाला ही थाळी कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा हं!

✨*BTB cloud kitchen & catering services* 🍽️
घरगुती चव, आपल्या खास क्षणांसाठी! 💕

अधिक माहिती व ऑर्डरसाठी संपर्क करा!

सारिका बकरे 9130365036
सागर बकरे 7741091224
अजित तांबेकर 9881129249













दिवाळी फराळ आणि समुद्राची भरती-आहोटी-सागर बकरे, कोल्हापूर दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आणि त्यासोबतच खमंग फराळाचा आनंद पण...
15/10/2025

दिवाळी फराळ आणि समुद्राची भरती-आहोटी

-सागर बकरे, कोल्हापूर

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, आणि त्यासोबतच खमंग फराळाचा आनंद पण. आता घराघरातून चकली, चिवडा, बाकरवडीचे सुवास दरवळायची वेळ जवळ आली असतानाच, सोशल मीडियावरील एका पोस्टने अनेक गृहिणींना चकली-करंजी-शंकरपाळी-पुडाच्या वड्या तळू की नको या विचारात पाडले आहे, आणि वर्किंग विमेन्स च्या कपाळाच्या आठ्या डबल झाल्या आहेत. "चकल्या भरतीच्या वेळी तळा, ओहोटीला तळल्या तर त्या तेल अधिक शोषतात" अशा आशयाची ही पोस्ट गेल्या काही वर्षांपासून दर दिवाळीला व्हायरल होते. ही कल्पना ऐकून काहींना गंमत वाटते, तर काहींच्या मनात संभ्रम निर्माण होते. खरंच, 'भरती-ओहोटी' ही सागरी घटना आपल्या कढईतील तेलावर परिणाम करते का?

मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी नसलो, तरी विज्ञानाबद्दल कुतूहल बाळगणारा आहे. कुकिंग हा माझा आवडता छंद आहे, आणि आता आम्ही एक व्यावसायिक केटरर म्हणून देखील बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळवली आहे. माझ्या अनुभवात, विशेषतः दिवाळी फराळ निर्मितीच्या बाबतीत, भरती-ओहोटीचा आणि त्याचा तळण्याशी काहीही संबंध नाही हे मी अगदी ठामपणे सांगू शकतो. ही 'भरती-आहोटी' पोस्ट वाचण्यापूर्वी बहुतेकांना असा विचारही सुचला नसेल, पण ती व्हायरल झाल्याने संभ्रम मात्र निर्माण झाला आहे.

आमच्या केटरिंग व्यवसायाची सुरुवातच दिवाळी फराळापासून झाली होती. त्या वेळी आम्ही आमच्या 'सात्विक फूड्स' मार्फत सुमारे चारशे-साडे चारशे किलो फराळ भारताबाहेर अनेक देशांत विक्री केला होता. या सर्व ऑर्डर्स मधून फराळाच्या दर्जाबाबत एकही तक्रार आली नाही. अर्थात, त्यावेळी भरती-आहोटीचा मुहूर्त पाहून फराळ बनवला नव्हता.

आपल्याला माहीत आहे की, भरती-ओहोटी ही 'चंद्र' आणि 'सूर्याच्याही' गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी नैसर्गिक घटना आहे. पण समुद्राचा प्रचंड जलसाठा आणि आपल्या कढईतील लीटर-दोन लिटर तेल यांची तुलना केल्यास हा दावा किती आधारहीन आहे हे लक्षात येते. काहीजण म्हणतील, की गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतोच होतो. होत असेल, तर रंकाळा तलावात भरती-ओहोटी आलेली पहिली आहे का? तलावात येत नाही, तर कढई तर त्याहून कितीतरी लहान आहे.

पोस्टमध्ये तिथीला तीन-चतुर्थांशने गुणाकार करून भरतीची वेळ काढा, असे गणित दिले आहे, मुळात ही पद्धत चुकिची आहे. आणि त्याचा तळण्याशी संबंध जोडणे हे तर त्याहून हास्यास्पद आहे. तसेच, 'ओहोटीच्या वेळी पदार्थ तेल शोषतात' असा दावा या पोस्ट मध्ये आहे, पण तेल शोषले जाण्याबद्दल विज्ञान वेगळे तथ्य सांगते.

जेव्हा आपण पदार्थ गरम तेलात टाकतो, तेव्हा सर्वप्रथम त्याच्या बाहेरील थरावर कुरकुरीत आवरण तयार होते. याला 'मायार्ड रिऍक्शन' म्हणतात. नुकताच 'बोभाटा' या फेसबुक पेजवर याबद्दल एक रंजक लेख माझ्या वाचनात आला. तो पर्यंत या प्रकियेला 'मायार्ड रिऍक्शन' म्हणतात हे मलाही माहीत न्हवते. त्याची लिंक मी पोस्टच्या पहिल्या कमेंट पिन करतो आहे. तर या अभिक्रियेमुळे पदार्थाला चव, तो खास तपकिरी रंग आणि कुरकुरीतपणा येतो. या प्रकियेत पदार्थातील पाणी वाफेच्या रूपात बाहेर पडते. ही वाफ पदार्थ आणि तेल यांच्यामध्ये एक अडथळा तयार करते, ज्यामुळे तेल पदार्थामध्ये शिरत नाही. ही प्रक्रिया शतकानुशतके चालत आली आहे. मायार्ड यांनी तिला वैज्ञानिक नाव दिले आणि रासायनिक प्रक्रिया नेमकी कशी होते हे निरीक्षणातून सिद्ध केलं.

तळणे ही एक 'हिट ट्रान्सफर' प्रक्रिया आहे, ज्यात पदार्थ दीडशे ते दोनशे अंश सेल्सियस तापमानात तेलात शिजवले जातात. यामुळे बाहेर कुरकुरीत थर तयार होतो आणि आतून पदार्थ शिजतो. तळताना पदार्थातील पाणी वाफ होऊन बाहेर पडते, ज्यामुळे बुडबुडे दिसतात. जर तापमान कमी असेल, मिश्रण जास्त ओलसर असेल किंवा तळण प्रकिया जास्त वेळ चालली, तर हा वाफेचा अडथळा कमकुवत होतो आणि पदार्थ तेल अधिक शोषू लागतात. यात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा, भरती आहोटीचा काहीही संबंध नाही. चकली किंवा अनारसे सारखे पदार्थ तळताना मिश्रणातला ओलावा वाफ होऊन बाहेर पडतो, आणि त्या जागी तेल प्रवेश करते, ज्यामुळे पदार्थ फुगतात, कुरकुरीत होतात आणि तेलकट पण होतात.

पदार्थांत तेल शोषण कमी व्हायचे असेल तर तेलाचा चॉईस
महत्वाचा आहे. यासाठी तळण्यासाठी 'हाय स्मोक पॉईंट' असलेली तेलं वापरणे उत्तम. स्मोक पॉईंट ला मराठी योग्य शब्द माहीत नाही. पण स्मोक पॉईंट म्हणजे तेल ज्या तापमानाला धूर सोडायला सुरू करते ते तापमान असे म्हणता येईल. यावेळी तेलातील रासायनिक घटक विघटित होऊन हानिकारक पदार्थ तयार होतात. हाय स्मोक पॉईंट असलेले मोहरीचे तेल यासाठी उत्तम मानले जाते, पण त्याचा कडवटपणा आणि विशिष्ट वासामुळे आपल्या भागात पर्यायी शेंगदाण्याचे तेल पसंत केले जाते. शुद्ध शेंगदाण्याचे तेल किंवा सूर्यफूल तेल व शेंगदाण्याचे तेल यांचा ब्लेंड वापरल्यास चव, पोत आणि आरोग्य यांचा समतोल साधता येतो. आमच्या 'BTB क्लाउड किचन' आणि केटरिंग सर्विसेस मध्ये आम्ही शुद्ध शेंगदाण्याचे तेल वापरण्याला प्राधान्य देतो.

तेल कमी शोषले जावे यासाठी काही टिप्स उपयोगी ठरतील. मिश्रण कमीतकमी ओलसर, जिन्नस योग्य बाईंड होतील इतपतच ठेवा. उदाहरणार्थ, कांदा भजी बनवताना कांद्याला सुटलेले पाणी आणि पुरेसे पीठ यांचा समतोल राखल्यास भजी खमंग होतात. अधिकचे पाणी टाकल्यास भजी चांगली होत नाही. तेल तापवताना सुरुवातीला कमी आचेवर तापवा, नंतर आच मध्यम करा. तेल शांत होऊन हालचाल थांबते तेव्हा ते तळण्यासाठी योग्य असते. जाड कढई वापरा, कारण ती उष्णता टिकवते आणि इंधन वाचवते. कढई मध्ये पदार्थ एकाच वेळी जास्त टाकू नका, कारण जास्त पदार्थ टाकल्यास तेलाचे तापमान कमी होते आणि शोषण वाढते. पदार्थ टाकल्यानंतर काही वेळ मोठ्या आचेवर- हाय फ्लेम वर तळा, आणि किंचितसा रंग बदलू लागला की मध्यम आचेवर आणा. दीडशे ते एकशे ऐंशी अंश सेल्सियस तापमान या साठी आदर्श आहे. आमच्याकडे इलेक्ट्रिक फ्रायर आहे, त्याला असे सेटिंग असतात. पण घरगुती वापरासाठी थर्मामीटर वापरता येईल, किंवा तेल तापल्यावर आधी एक-दोन गोळे टाकून आपण सॅम्पल पाहतो ती ही पध्दत योग्य आहे. तळल्यानंतर पदार्थ जाळीवर किंवा शोषक कागदावर ठेवा. (हे करण्यासाठी रद्दी कागद मात्र टाळा, कारण त्या वरील शाईमध्ये घातक असे लीड धातू असते.)

बाजारात काही 'फ्राईंग पावडर' मिळतात, ज्याच्या वापराने तेल शोषण वीस तीस टक्क्यांनी कमी होऊ शकते. या पावडर ची जाहिरात करताना, 'तेल हलके होते' असा दावा करतात. प्रत्यक्षात तेल हलके होत नाही मात्र पदार्थाला अधिकचे एक कोटिंग येते आणि तेल शोषण कमी होते. उदाहरणार्थ, फ्रेंच फ्राईजला मैद्याचे-कॉर्न फ्लॉवर चे हलके आवरण देऊन तळल्यास तेल शोषण कमी होते, आणि फ्राईज अधिक कुरकुरीत होतात. 'पेक्टीन' हा फळसाली पासून बनलेला मुख्य घटक या पावडर मध्ये असतो.

मोठ्या प्रमाणात फराळ करणार असल्यास 'हाफ डन-डबल फ्रायिंग' ही पद्धत उपयोगी पडेल. मुख्यतः स्नॅक्स, भजी, बटाटेवडे, फ्रेंच फ्राईज, चिकन विंग्ज, चिकन 65 वगैरे पदार्थ कुरकुरीत करण्यासाठी ही वापरली जाते.

या मध्ये एक पदार्थ दोन टप्प्यामध्ये शिजवला जातो, सुरुवातीला अर्धा कच्चा अर्थात हाफ डन फ्राईंग मध्यम तापमानाच्या तेलात केला जातो, यामुळे पदार्थाचा आकार सेट होतो आणि आतून अधिक शिजला जातो.

पदार्थ कोमट अथवा गार झाल्यावर सेकंड फ्रायिंग (डबल फ्रायिंग) केला जातो, मात्र यावेळी हाय फ्लेमवर पटकन परतला जातो. या मुळे पदार्थ बाहेरून खरपूस, कुरकुरीत होतो. केटरिंग, हॉटेल, स्ट्रीट फूड्स, आणि फास्ट फूडमध्ये जॉईंट मध्ये ही पद्धत सर्वजण वापरतात, या मुळे तयारीचा वेळ कमी होतो व आयत्यावेळी पटकन आणि गरमागरम सर्व्ह करता येते.

तेल कमी ओढले जाण्यासाठी 'डबल कोटिंग' पद्धत देखील वापरली जाते. प्रामुख्याने नॉनव्हेज फ्राईड आणि डीप फ्राय कटेलेट मध्ये डबल कोटिंग केले जाते. 'केंटकी फ्राईड चिकन' म्हणजेच KFC चिकन हे आपल्या कुरकुरीत पणा आणि ज्यूसी चिकन साठी प्रसिद्ध आहे. तिथे आपण ही डबल कोटिंग पद्धत पाहू शकतो. पण दिवाळी फराळ पदार्थात ही पद्धत खचितच वापरू शकू.

लेज, बालाजी, हल्दीरामसारख्या कंपन्या सतत चालणाऱ्या (कॅन्टीन्यू फ्रायर स्टेशन) फ्रायरमध्ये एकावेळी पाचशे ते सहाशे लिटर तेल वापरतात. हे तेल सतत फिल्टर केले जाते, आणि एका शिफ्टमध्ये हजारो किलो चिप्स आणि स्नॅक्स तयार होतात. वेगवेगळ्या राज्यात, देशात वेगवेगळ्या वेळी या शिफ्ट सुरू असतात. त्यांनी कधीही भरती-ओहोटीच्या वेळा पाहून तळणी केल्याचे किंवा मुहुर्त चुकल्याने त्यांचा दर्जा घसरल्याचे ऐकिवात नाही.

दिवाळीचा फराळ ही वर्षानुवर्षे समृद्ध होत आलेली कला आहे, तिला परंपरा आणि विज्ञानाचीही जोड आहे.

योग्य तेल, तापमान, बनवण्याची
पद्धत आणि घरातील ज्येष्ठ अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन फराळ बनवा. विज्ञानाच्या मदतीने आपण आपली परंपरा अधिक समृद्ध करू शकतो.

तर ताया-बायांनो, आधीच हाताशी वेळ कमी आहे, भरती-ओहोटीच्या अफवांवर विश्वास ठेवून वेळ वाया घालवू नका. कोणीतरी 'बिचारा जीव' तुम्ही गरम गरम चकली किंवा बाकरवडी बाहेर काढणार आणि मी ती गरम गरमच खाणार या कल्पनेत घराचा हॉल ते किचन दरम्यान तरंगत असेल…

आपल्याला आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आमच्या शुभेच्छा! शुभ दीपावली!

१५ ऑक्टोबर २०२५

सागर विद्या विलास बकरे, कोल्हापूर
संचालक- सतसात्विक फूड्स प्रा. लि.
संचालक, BTB क्लाउड किचन व केटरिंग सर्व्हिसेस
संपर्क: 7741091224

🙋‍♂️ *BTB क्लाऊड किचन - आकाडी बुधवार स्पेशल  फॅमिली ऑफर*🎉🍗 *BTB स्पेशल चिकन मसाला फक्त 1400/मध्ये*  *1 किलो BTB स्पेशल च...
16/07/2025

🙋‍♂️ *BTB क्लाऊड किचन - आकाडी बुधवार स्पेशल फॅमिली ऑफर*🎉

🍗 *BTB स्पेशल चिकन मसाला फक्त 1400/मध्ये*

*1 किलो BTB स्पेशल चिकन मसाला*
*1 किलो इंद्रायणी भात*
*15 चपाती*
*तांबडा रस्सा*
*पांढरा रस्सा*
*दही कांदा*
*मीठ*
*लिंबू*

( *सर्व पदार्थ शेंगतेलात बनविले जातात. आपल्याला ऑर्डर घरपोच दिली जाते*)

📝 *ऑर्डरसाठी संपर्क :*
*सारिका बकरे - 9130365036*
*सागर बकरे - 7741091224*
*अजित तांबेकर - 9881129249*

स्वादिष्ट डिश बनवायची तर हाताशी भरपूर वेळ हवा. पण झपाट्याने धावणाऱ्या आयुष्याच्या लढाईत वेळ मिळवणं म्हणजे एक दिव्यच! पण ...
08/02/2025

स्वादिष्ट डिश बनवायची तर हाताशी भरपूर वेळ हवा. पण झपाट्याने धावणाऱ्या आयुष्याच्या लढाईत वेळ मिळवणं म्हणजे एक दिव्यच!

पण जर कोणी तुमच्यासाठी स्वादिष्ट डिशची तयारी करून दिली, तर ही लढाई अर्धी जिंकल्यासारखीच आहे ना? 😉

ऋतू बदलाच्या या सुखद वातावरणात, काही मित्रांचं गेटटुगेदर ठरलं होतं. “तयार पदार्थ ऑर्डर करण्यापेक्षा आम्ही स्वतःच काही गरमागरम करू शकतो का?” असा विचार त्यांनी मांडला, आणि आम्ही त्यांना मॅरीनेट पदार्थांचा ऑप्शन सुचवला. त्याच संध्याकाळी आपल्या आवडीच्या पदार्थांचे मॅरीनेट केलेले पनीर कबाब, पनीर टिक्का, मटण चॉप्स आणि चिकन कबाब पाहून, ‘बार्बेक्यू’ आधीच त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं होतं.

"चांदण्यांनी न्हालेली थंडगार रात्र, हातात गरमागरम कबाब आणि मित्रांसोबत धमाल! हीच तर BBQ पार्टीची खरी मजा!" मित्रमंडळींसोबत, कुटुंबासोबत तुम्हांलाही भन्नाट बार्बेक्यू पार्टीचा आनंद घ्यायचा आहे का? 🍽️🔥

BTB क्लाऊड किचनच्या माध्यमातून आम्ही खास ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमध्ये मॅरीनेट केलेले व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ आम्ही बनवतो. तुम्ही जर BBQ पार्टीचे नियोजन करीत असल्यास आम्हाला स्वादिष्ट मॅरीनेशन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि तुमच्या सर्व स्वादिष्ट डिश बनवून तुमची पार्टी यादगार बनवू ...!

अधिक माहिती व ऑर्डरसाठी संपर्क करा!

BTB Cloud Kitchen
- Authentic Taste, Delivered Fresh!

सारिका बकरे 9130365036
सागर बकरे 7741091224
अजित तांबेकर 9881129249













हे फोटो जवळपास वर्षभर जुने आहेत. त्या काळात आम्ही केवळ क्लाऊड किचनमधूनच सेवा देत होतो. हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला, आणि...
11/12/2024

हे फोटो जवळपास वर्षभर जुने आहेत. त्या काळात आम्ही केवळ क्लाऊड किचनमधूनच सेवा देत होतो. हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला, आणि आम्ही आउटडोर केटरिंगच्या ऑर्डर्सही स्वीकारायला लागलो.

फूड व्यवसायात कोणतेही काम करत असताना संबंधित फूड लायसन्स असणे अत्यावश्यक असते. क्लाऊड किचन सुरू करण्यापूर्वीच आम्ही नैसर्गिक सरबतांच्या व्यवसायात होतो आणि त्यासाठी आवश्यक असणारी सर्व लायसन्सेस आमच्याकडे होती. मात्र, क्लाऊड किचन सुरू करताना, डिलिव्हरी सेवेसह व नंतर आउटडोर केटरिंग सुरू केल्यानंतर, लायसन्सेस अपडेट करणे गरजेचे झाले, आणि ते आम्ही केले.

संबंधित खात्याचे अधिकारी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी भेट देऊन जागेची तपासणी करतात, त्यानंतर आपल्याला प्रमाणपत्र मिळते. अधिकारी येणार, ही कल्पनाच थोडी धाकधूक निर्माण करते—काय होईल जर लायसन्स मिळाले नाही तर?

मात्र, जेव्हा वरील फोटोतील आउटडोर केटरिंगची ऑर्डर आली, तेव्हा लायसन्सच्या ताणापेक्षाही जास्त ताण आला. कारण ही ऑर्डर होती अन्न व औषध प्रशासनाच्या माननीय सहआयुक्तांची. पुणे विभागात कार्यरत असलेल्या, मूळच्या कोल्हापूरच्या या महिला अधिकाऱ्यांनी कोल्हापूरमध्ये नवीन घर घेतले होते. त्या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्त आयोजित भोजन व्यवस्थेची जबाबदारी BTB क्लाऊड किचनला देण्यात आली होती.

वास्तुशांतीचा कार्यक्रम संपेपर्यंत आमची आणि यजमानांची भेट झाली नव्हती. त्यांना आपल्या BTB क्लाऊड किचनबद्दल कोणी तरी शिफारस केली होती, आणि त्यांच्या कोल्हापूर ऑफिसमधील एक वरिष्ठ कर्मचारी सर्व व्यवस्था पाहत होते. शेवटी, जेव्हा यजमान जेवायला आले आणि त्यांनी आमच्या जेवणाचं आणि सेवेचं कौतुक केलं, तेव्हा कुठे आमचा जीव भांड्यात पडला. लायसन्स मिळवण्यापेक्षा ही परिस्थिती आमच्यासाठी अधिक सत्त्वपरीक्षेची वाटली, आणि ती यशस्वीरीत्या पार पाडल्याचा आनंदही झाला.

या कार्यक्रमानंतर, आता छोटा असो वा मोठा कार्यक्रम, माननीय सहआयुक्त स्वतःच आम्हाला संपर्क करतात. ग्राहक आणि व्यावसायिक हे नातं मागे पडून एक वेगळं आपुलकीचं नातं आता तयार झालं आहे.

📞 ऑर्डरसाठी संपर्क करा!
BTB Cloud Kitchen
- Authentic Taste, Delivered Fresh!

BTB क्लाउड किचन, कोल्हापूर.
सारिका बकरे 9130365036
सागर बकरे 7741091224
अजित तांबेकर 9881129249









आणि मोमोज वर शिक्कामोर्तब झाले..झालं असं कि, SCGT कोल्हापूर रिजन मधील, कोल्हापूर प्लॅटिनम ऊर्जा चॅप्टर चे आणि स्टेशन रोड...
06/11/2024

आणि मोमोज वर शिक्कामोर्तब झाले..

झालं असं कि, SCGT कोल्हापूर रिजन मधील, कोल्हापूर प्लॅटिनम ऊर्जा चॅप्टर चे आणि स्टेशन रोडवरील इंगळे साडी चे संचालक श्री. प्रथमेश इंगळे यांचे ‘वन-टू-मेनी’ होणार होते. ‘वन-टू-मेनी’ ला येणाऱ्या गेस्ट साठी मेन्यू काय असावा अशी चर्चा करण्यासाठी ते आमच्या BTB क्लाउड किचनमध्ये चर्चेसाठी आले होते. त्याचवेळी आमच्या घाटी दरवाजा येथील ‘सात्विक स्नॅक्स अँड ड्रिंक डिलाईट’, या फूड आउटलेट साठी ताजे व्हेज मोमोज बनवणे सुरु होते. मोमोज इथे किचन मध्ये बनतात, थोडे फ्रिज करून पॅक केले जातात व फूड आउटलेट मध्ये स्टीम करून ग्राहकांना चटणी, सॉस, मेयॉनीज बरोबर सर्व्ह केले जातात.

आमचा मुलगा वसुमित्र आमच्याप्रमाणेच प्रयोगशील आहे. त्या दिवशी कॉलेज संपवून तो देखील किचन मध्ये आला होता. संध्याकाळी घरी श्रीखंड बनवण्यासाठी चक्का बनवून ठेवला होता. तो पाहून वाटीभर चक्क्यामध्ये त्याने आम्ही अमेरिकन पॉपकॉर्न बनवण्यासाठी चीझ पावडर, पेरिपेरी मसाला वापरतो तो घातला, थोडी काळी मिरी, मीठ आणि ताजा ठेचलेला लसूण ऍड केला. हे कॉम्बिनेशन अगदी जबरदस्त जुळून आलं होत.

क्लाउड किचनमध्ये चर्चेसाठी आलेल्या इंगळेंना, काही मोमोज स्टीम करून दिले. आम्ही नेहमी मोमोज सोबत नेहमी नेपाळी पद्धतीची पारंपरिक चटणी देतो, पण हि चटणी अजून बनली नसल्याने वसुमित्राने बनवलेली हि जुगाड चटणी सर्व्ह केली. मोमोज सोबत चटणीचा एक घास खाताच, पुढे होणाऱ्या चर्चेला विराम मिळाला. आपण अन्य काही स्नॅक्स नको करयला, मोमोज आणि सोबत हीच चटणी पाहिजे इंगळे म्हणाले. मग आम्ही देखील तयारीला लागलो.

एका प्लेट मध्ये पाच मोमोज, शंभर लोकं मीटिंगला येणार असं गृहीत धरलं तरी किमान ५०० मोमोज, ते देखील फ्रेश बनवलेले व गरमागरम खाऊ घालणे हा वाटतो तितका सोपा टास्क नाही. कार्य्रक्रमाच्या दिवशी अगदी सकाळपासून आमची टीम कामाला लागली होती. तेथील जागेच्या अभावी आणि मिटिंग साठी येणाऱ्या मेंबर्स व ग्राहकांची संख्या पहाता, तिथे प्रत्यक्ष मोमोज स्टीमर लावणे शक्य नसल्याने किचन मध्ये पॅक करून तिथे सर्विस देण्याचं नियोजन आम्ही केलं होतं.

कोल्हापूर रिजन मधील विविध क्लब मधील १०० पेक्षा अधिक मेंबर्स या मीटिंगला हजर होते. संध्याकाळी असणाऱ्या या ‘वन-टू-मेनी’ मिटिंग नंतर भुकेच्या वेळी, पोटभर मोमोज मिळाल्याने आलेले सर्व मेम्बर्स यजमानांवर खुश होते.

SCGT परिवाराच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद...!

(SCGT अर्थात ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ हा 'मराठी' उद्योजक आणि व्यवसायिकांना मोठ्याप्रमाणात एकत्र आणणारा जगातील एकमेव नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे. क्लबचा मुख्य उद्देश्य म्हणजे उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा आहे. नेटवर्किंग साठी विविध प्रकारच्या मिटिंग वेळोवेळी आयोजित केल्या जातात, त्या पैकीच एक मिटिंग म्हणजे ‘वन टू मेनी’ मिटिंग. या मिटिंग मध्ये क्लब मधील एक व्यावसायिक इतर मेंबर्सना आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी बोलावून व्यवसायाची सविस्तर माहिती देतो.)

ऑर्डरसाठी संपर्क:
BTB क्लाउड किचन, कोल्हापूर.
सागर बकरे 7741091224
सारिका बकरे 9130365036
अजित तांबेकर 9881129249












Address

Kolhapur
416002

Telephone

+917820875924

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BTB Cloud Kitchen & Catering Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BTB Cloud Kitchen & Catering Services:

Share

Category