Swar kavyanjali manch

  • Home
  • Swar kavyanjali manch

Swar kavyanjali manch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swar kavyanjali manch, Performance & Event Venue, 6/1 madhavi chs .rajaji rd.cross lane 3 ramnagar, .

05/12/2025

दत्त जयंतीच्या निमित्त्याने
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 कलियुगामध्ये सकारात्मक ऊर्जा पुरवीत, आपल्या अस्तित्वाची साक्ष देत, भक्तांना कायम आधारभूत असलेल्या दत्त प्रभूंची ,त्यांचे भक्तगण ध्यान, धारणा, जप, गुरुचरित्र पारायण, दत्तधाम यात्रा इत्यादि विविध प्रकारे ,यथाशक्ती मनोभावे उपासना करीत असतात,त्यांना आळवीत असतात.
स्तुतिस्तोत्र पठण, भजन, कीर्तन, गायन हे पण सेवाचेच प्रकार! तेव्हा शास्त्रीय संगीतातील राग प्रणालीच्या अनुषंगाने केलेली, ही शब्द फुलांची गुंफण म्हणजे, मनात उमलत जाणाऱ्या त्या भक्तीचीच खूण का मानू नये???
हळूहळू फुलत जाणाऱ्या या भक्ति फुलोऱ्यात, भौतिक सुखविवर्जीत अशा सात्विक दत्तकृपेची अभिलाषा असणे हे पण काही गैर नव्हेच.
🌸🌸🌸🌸🌸
संगीत सेवा
🌸🌸🌸🌸🌸
दत्त सख्या गुरुराया देवा
अर्पण चरणी संगीत सेवा||धृ||

मेल थाट हा मंगल्याचा
शांत भक्ति अन् प्रेम रसाचा
भाव जयातच समर्पणाचा
राग 'नामजप' मान्य असावा||१||

नितांत श्रद्धा वादि जयाचा संवादी तो सातत्याचा
वर्ज्य स्वर नित अहंकाराचा
सिद्ध मंत्रजप श्रवण करावा|२||

राग असे हा मिश्र जातीचा
अनवट परि हो पावित्र्याचा
षड्ज लावता तल्लिनतेचा 'स्मर्तृगामी तू' अनुभव द्यावा|३||

सुख आरोही क्षय दुःखाचा
ध्यानधारणा विस्ताराचा
राग समय श्वासोश्वासाचा
आळवणीचा स्विकार व्हावा||४|

लय ताला स्तव मणि माळेचा आवर्तन दे मोद समेचा
हृदयी घुमता नाद परेचा
दुजाभाव तो विलया न्यावा||५||

स्थाइ -अस्थाई उपासनेचा
छंदच जडला समरसतेचा
हेतु भाबडा अनुभूतीचा
दर्शन देऊन पूर्ण करावा||६||

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
ह.भ.प. सौ .अंजली जोशी. डोंबिवली.
8591534300
गुरुवार .०४|११|२०२५
==============
विवेचन
शास्त्रीय संगीत जाणकारांना कवितेतील शब्द फुलांचा गंध सहज जाणवेल ,पण पुष्पगुच्छ किंवा पुष्पहाराची रचना करतांना रंगसंगती व समतोल रचना जशी महत्त्वाची तसे शास्त्रीय संगीतातील संज्ञांच्या अर्थाची नेमकी भावनांशी गुंफणही महत्त्वाची!! म्हणून हा थोडा खुलासा इतरांसाठी.
शास्त्रीय संगीतात जे स्थान राग गायनाचे तेच स्थान व महत्त्व दत्तगुरूंच्या सेवेत नामजपाचे. संगीतातील रागांचे काही नियम असतात ,
नामजप सुद्धा शिस्तबद्ध व नियमानुसारच व्हायला हवा.

*कुठलाही राग जसा ठराविक स्वरांच्या मेल किंवा थाटातूनच उत्पन्न होणारा व रसोत्पादक, तसा "नामजप" हा मांगल्यातून उपजणारा व भक्ती प्रेम आणि शांत रस निर्माण करणारा.
* तीळमात्रही अहंकार भगवंताला सहन होत नाही त्यामुळे नामजप रागात अहंकाराचा स्वर पूर्णतः वर्ज्य.
रागातील महत्त्वाचा स्वर वादी त्या खालोखाल संवादी तद्वत
नितांत श्रद्धा आणि सातत्यानेच जप पुढे सिद्ध मंत्र बनतो.
* रागात येणाऱ्या स्वरसंख्येनुसार रागाच्या ओडव, षाडव ,संपूर्ण किंवा मिश्र अशा जाती, तसेच पंचाक्षरी षडाक्षरी दशाक्षरी इत्यादी प्रकार जपाचे. षड्ज लावताच येणारी तल्लीनता सुरुवातीच्या ओंकार उच्चारणाने येऊ शकते व दत्तप्रभूंच्या स्मर्तुगामीपणाचा अनुभव येऊ शकतो.
अर्थात ही सेवा किंवा उपासना प्रसन्नता देणारी असली ,तरी सरसकट सगळ्यांनाच रुचेल असे नाही ना! नास्तिक वृत्तीच्या लोकांना माहित नसलेली किंवा अप्रचलित असलेली, संगीतातील काही राग अनवट असतात ना तसाच हा प्रकार
* नामजपात सुख चढत्या क्रमाने म्हणजे आरोही तर दुःख उतरत्या क्रमाने जाणारे म्हणजे क्षयी किंवा अवरोही. आलाप ताना घेत घेत रागाचा विस्तार तसा ध्यान धारणेंनी नाम जपाचा विस्तार .
*राग नियमित समईच गायचा जप मात्र श्वासोश्वासात गुंफायचा
* संगीतात जेवढे महत्त्व लय तालाला तेवढेच महत्व जपात हाती घेतलेल्या माळेला. माळेचा मेरू मणी आला की जणू तालातील महत्वपूर्ण मात्रा म्हणजे सम गाठत तालाचे एक आवर्तन पूर्ण झाल्याचा आनंद
* संगीतातील स्वर असो वा नामातील शब्द असो परावाणीतून नाद हृदयात घुमणे महत्त्वाचे. तोच तर देवाला प्रिय असतो.
* रागातील बंदिशीचा पूर्व भाग स्थाई /अस्थाई, खालच्या आवाजातील मंद्र वा मध्य सप्तकात गावा नामजपाची उपासनाही हळूहळू शांत चित्ताने
व्हावी ती आक्रमक किंवा उच्च स्वरात नसावी.
* एखादा राग समरसून तल्लीन होऊन आळवावा अगदी तसेच या "नामजप " रागाचे नियम असावेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने नामजप करता करता केवळ अनन्यतेचा आणि दत्तप्रभूंच्या कृपेचा लाभ व्हावा तशी अनुभूती यावी ही मागणी अवाजवी ठरू नये.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सौ अंजली जोशी डोंबिवली
८५९१५३४३००
==========

11/04/2025

हनुमान जन्मोत्सव
🌹🌹🌹🌹🌹

राम जन्मोत्सवा नंतर लगेचच येणारा हनुमान जन्मोत्सव देखील तितकाच महत्वाचा सण! या दिवशी पहाटे पांच वाजल्यापासूनच सर्व हनुमान मंदिरात प्रसन्न आणि उत्साही वातावरणात भक्तांची लगबग दिसू लागते. तसं पाहिलं तर रामापेक्षा हनुमंताची मंदिरे सर्वत्र जास्त आढळतात, त्यामुळे रामा पेक्षा हनुमान भक्त जास्त किंवा रामापेक्षा हनुमान भक्तांना जवळचा वाटतो असे म्हणायला हरकत नाही. कबीरांचा एक दोहा आहे

(भगवान से भक्तन बडे
कह गये संत सुजाण
पूल बांधे रघुवीर चले
कुदी गये हनुमान ||)

लंकेत जाण्यासाठी रामाला पूल बांधावा लागला. शंभर योजनांचा तो पूल ओलांडायला रामाला पांच दिवस लागले ,मात्र हनुमान त्या अगोदर उड्डाण करून लंकेत जाऊन आला होता .रामाने अकरा हजार वर्षे राज्य केले आणि अवतार संपवला मात्र सहा दिवसानंतर जन्मलेले हनुमान सप्तचिरंजीवांपैकी एक आहेत. आपल्या भक्तांची संकटे दूर करणारा ,त्यांचे भय नष्ट करणारा, त्यांना बुद्धि ,बल, चातुर्य, देणारा हनुमंत देव तर आहेच , शिवाय राम भक्तांना रामा पर्यंत पोहोचविणारा, रामाची गाठभेट घालून देण्यात मदत कार्य करणारा, ज्येष्ठ असा रामदासही आहे .
हन म्हणजे मारणे आणि मान म्हणजे अभिमान .हनुमान अभिमानी लोकांचे हनन करणारा आहे आणि स्वतःचा सगळा अभिमान यानी रामाला अर्पण केलेला आहे.
सर्व गुणसंपन्न असलेल्या या हनुमंताच्या नुसत्या स्मरणाने केवढे फायदे होतात बघा

(बुद्धीर्बलं यशोधैर्यं
निर्भयत्वमरोगता
अजायं वाक्पटुत्वंच
हनुमत्स्मरणात भवेत|)

अत्यंत लोकप्रिय असलेल्या रामायणातून हनुमान गाळल्यास गाळच उरेल असे म्हणावेसे वाटते .राम ,सीता, लक्ष्मण, भरत सगळ्यांवरच याने फार मोठे उपकार केलेले असून त्याच्या गुणांचं वर्णन तरी किती करावं ???
विनयशीलता,
विलक्षणबुध्दिमत्ता, समर्पणभाव,गायनाचार्य, अत्यंत बलवान, पराक्रमी सर्व विद्याज्ञानी, सर्व शास्त्र पारंगत, योग विद्या जाणणारा, मुत्सद्दी शूर,संयमी, दशग्रंथी ,अत्यंत चपळ!! बलवान तर एवढा की द्रोणागिरी पर्वतच त्याने उचलून आणला . राम आणि लक्ष्मण दोघा बलाढ्य वीरांना एकाच वेळी तो आपल्या दोन खांद्यांवर घेऊन चालत असे .

(नीतीमत्ता धैर्य बल पराक्रम शूरता |
दास्य समर्पण भाव भक्ती तेज वीरता|
विनम्रता वाक्पटुत्व प्रभाव आणि दक्षता|
निर्भयत्व बुद्धी यश गती गुणसंपदा ||)

हनुमंताचा पराक्रम पाहून अत्यंत बलंदंड आणि पराक्रमी, महाकाय रावण, देखील हतबुद्ध , अचंबित आणि भयचकीत होऊन म्हणाला होता,

(हा नच वानर काळच प्रगटे
करण्या विश्‍वसंहार
इंद्र वरुण वा अग्नीचा हा
सूर्य चंद्र की कुबेराचा
पवनाचा अवतार ||
त्रैलोकी वा त्रिकाळातही
या सम ना होणार
पराक्रमी, या सम ना होणार||)

हनुमंताचे बल, साहस, पराक्रम, युक्ती या गुणांमुळे शत्रू थरथर कापत असे . प्रचंड बलवान आणि अत्यंत पराक्रमी असूनही हनुमंतला जराही गर्व नव्हता तो विलक्षण नम्र होता.
हनुमंताला अनेक सिद्धी प्राप्त होत्या .
(अणिमा ,महिमा, गरिमा, लघिमा |,
प्राप्तिं प्राकाव्यं इशिता वशिता |अष्ट सिद्धी प्राप्त हनुमंता||)

सीतेने बक्षिस दिलेल्या पृथ्वी मोलाच्या रत्नमालेतील सर्व मणि आपल्या दातांनी फोडून त्यात रामरुप शोधतांना

(रामरत्नं अहं वंदे कौशल्या कुक्षी संभवं||)

म्हणणारा हा हनुमान. धन आणि ऐश्वर्याच्या कामाप्रमाणेच स्त्री कामापासूनही अलिप्तच होता.
भक्तांच्या संकटांकडे ती पळवून लावण्यासाठी मोठे डोळे करून बघणा-या हनुमंताची, गदा ,मुद्गर, परिघ गिरीशिखर , पुच्छ म्हणजे शेपटी ,आणि मुठ्ठी ही हत्यारेआहेत!!
कैलास पर्वत उचलणाऱ्या बलाढ्य रावणाला याने केवळ मुष्टी प्रहाराने घायाळ केले अक्ष कुमारच्या आठ घोड्यांना ठार केले आणि अनेक राक्षसांना सहजी यमपुरीची वाट दाखविली. परिघाने जम्बुमालीचा वध केला. गदेच्या एका तडाख्याने रावणाचा रथ तोडला ,बलशाली रावण पुत्र अक्षाला मुद्गराने तर धुम्राक्षाला गिरीशिखराने ठार केले .चित्रसेनादी तेहतीस कोटी गंधर्वांना आपल्या पुच्छात गुंडाळून थेट समुद्रात फेकले .हनुमंताच्या पायातही प्रचंड शक्ती होती ,ज्या पर्वतावर तो पाय ठेवी तो पर्वत लगेच भूसपाट होत असे .
प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी अनेकदा त्याच्या पराक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केलेली आहे .
रामाने एकदा हनुमंताला विचारले, "हनुमंता तू नेमका कोण आहेस रे??" त्यावेळी अतिशय हुशारीने हनुमंताने उत्तर दिले "आपण देह म्हणून विचारत असाल तर मी तुमचा दास आहे आपण जीव म्हणून विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे आणि आत्मा म्हणून विचारत असाल तर तुम्ही व मी एकच आहोत.त्वमेवाहम!!"यावर रामाने खुश होऊन विचारले हनुमंता तू माझ्यावर एवढे उपकार केले आहेस प्रत्येक उपकारासाठी मी प्राण द्यायचे म्हटले तर माझ्याकडे फक्त पंचप्राणच आहेत तुला मी काय देऊ"? तेव्हा अत्यंतनम्रतेने आणि चातुर्याने हनुमंताने फक्त पाट मागितला. म्हणाला,"रामा जिथे जिथे आपले कीर्तन चालू असेल, स्तुतीगान चालू असेल ,भजन चालू असेल तिथे तिथे मला उपस्थित रहाता यावे.तिथे बसण्यासाठी मला पाट हवा." अशा अमृतमय वाणी असलेल्या वाक्चतुर भक्ताला रामाने मग चिरंजीवीत्वच बहाल केले.
हनुमंताचे वाकपटुत्व रामायणात अनेक प्रसंगी दिसून येते.
"याची वाणी उत्तम लक्षणांनी संपन्न असून बुद्धीच्या आठ अंगानी ती समृद्ध आहे. हा अमृत मुखी आहे"
असे सीता प्रेमाने म्हणतअसे.

दशरथाने केलेल्या पुत्र कामेष्टी यज्ञातून प्रत्यक्ष यज्ञदेवाने प्रकट होऊन जे पायस दान दिले त्या तील कैकेच्या हातातील पिंड एका घारीने झडपून नेला व ॠश्यमुक गिरी पर्वतावर पुत्रप्राप्तीस्तव शिव आराधना करीत बसलेल्या अंजनीच्या ओंजळीत आणून टाकला. ही सर्व घटना ईश्वर इच्छेनेच झाली होती .भक्तजनांचे पालन आणि दृष्टांचा विनाश हाच हेतू यामागे होता.
अंजनी नामक वानरीच्या पोटी वायूच्या कृपाप्रसादाने झालेला, अकरावा महारुद्र अवतार म्हणजे जन्मताच सूर्य बिंबाकडे गरुड झेप घेणारा बालहनुमान होय.
(सद्गुणशाली अक्षय|
दृढ तनु सुत दे मला महादेवा|| रविकुलमंडन सीता पतिची त्याला घडो सदा सेवा||)
असा वर अंजनीने शिवाकडे मागितलेला होता.
चैत्र शुद्ध पौर्णिमेला शनिवारी सूर्योदय समई प्रकटलेला प्रत्यक्ष शंकराचा हा अवतार म्हणजे
*न भूतो न भविष्यती असा चमत्कार आहे*
भक्तांनी संकट मुक्ती किंवा विघ्न नाशनासाठी वीर हनुमंताच्या गदाधारी मूर्ती ची पूजा करावी. सुख शांती आणि अध्यात्म मार्गातील प्रगतीसाठी हात जोडून रामासमोर बसलेल्या दास मारुतीची उपासना करावी.
भक्तांनी दर शनिवारी हनुमंताच्या उजव्या खांद्यावरील शेंदूर आपल्या कपाळी लावावा आणि घराच्या दारावर त्या शेंदुराने श्रीराम लिहावे म्हणजे बाहेरील दुष्ट वृत्ती त्रास देत नाहीत.

ह.भ.प. सौ.अंजली जोशी.
डोंबिवली.8591534300

02/02/2025
01/02/2025

Address

6/1 Madhavi Chs .rajaji Rd.cross Lane 3 Ramnagar

421201

Telephone

+919323019351

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swar kavyanjali manch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share